शेतकर्यांचे आंदोलन पेटले! - केंद्रीय कृषी कायद्याविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण - पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने शेतकर्यांची दगडफेक न...
शेतकर्यांचे आंदोलन पेटले!
- केंद्रीय कृषी कायद्याविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण
- पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने शेतकर्यांची दगडफेक
नवी दिल्ली/ विशेष प्रतिनिधीकेंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कृषीविरोधी कायद्याच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या शेतकर्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीमार करत अश्रुधुराचे नळकांडे डागले. रात्रीच्या काळोखात हा अत्याचार करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर हे केंद्र सरकारविरोधी आंदोलन चांगलेच पेटले. दिल्लीच्या सीमेवर अभूतपूर्व धुमश्चक्री पहायला मिळाली. तसेच, पंजाबपासून ते हरियानापर्यंत तीव आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकर्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महामोर्चा काढला होता. शेतकर्यांचा हा मोर्चा दिल्लीत येणार असल्याने दिल्लीच्या सर्व सीमांवर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला. मोर्चा सीमेवर पोहोचताच पोलिसांनी तो अडवला. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांत मोठा संघर्ष निर्माण झाला होता. अंबाला-पटियाला सीमेवर दिल्ली पोलिसांनी शेतकर्यांवर अमानुष लाठीमार केला. तसेच, पाणी फवारले व अश्रुधुराचे नळकांडे डागले. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, बुधवारी रात्री आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यांवर पाण्याचे फवारे मारणार्या दिल्ली पोलिसांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. दिल्लीत पडलेल्या कडाक्याच्या थंडीत पोलिस आंदोलकांवर पाण्याचे फवारे कसे काय मारू शकतात, असा प्रश्न विचारण्यात आला. हरियाणा-दिल्ली सीमेवरील अंबाला येथेदेखील पोलिसांनी याच घटनेची पुनर्रावृत्ती केली. या घटनेचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदरसिंग यांच्यासह शेतकरी नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दुसरीकडे, आग्रा-ग्वाल्हेर महामार्गावरदेखील शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेतकर्यांच्या समर्थनार्थ दिल्लीला जाणार्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलन करणार्या शेतकर्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनीही करनालमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी दिल्ली-चंदीगड हा राष्ट्रीय महामार्गदेखील बंद केला होता.
केंद्र सरकार नरमले; 3 डिसेंबरला चर्चेची तयारी
कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील छेडलेल्या उग्र आंदोलनानंतर आता केंद्र सरकार पहिल्यांदाच नरमले आहे. केंद्र सरकारने आता शेतकर्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. 3 डिसेंबरला आम्ही शेतकर्यांशी चर्चा करु, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. नवे कृषी कायदे ही काळाची गरज आहे. आगामी काळात त्यामुळे क्रांतिकारी बदल पाहायला मिळतील. या कायद्यांविषयी असणारे शेतकर्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही पंजाबमध्ये सचिव स्तरावर चर्चाही केली आहे. त्यामुळे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आंदोलन करु नये. आम्ही या समस्येवर चर्चा करुन मार्ग काढण्यास तयार आहोत. या चर्चेतून काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.