Breaking News

एसटी कामगार संघटनेचे आज राज्यभर आक्रोश आंदोलन

एसटी कामगार संघटनेचे आज राज्यभर आक्रोश आंदोलन
- एसटीकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा


धुळे / प्रतिनिधी
एसटीच्या एक लाख १० हजार कर्मचार्‍यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचे सोमवारी राज्यभर आक्रोश आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्रक एसटी प्रशासनाने जारी केले आहे. दरम्यान, कामगार करार आणि वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ठोकणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला. तर दुसरीकडे एसटी कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळावे, थकीत तीन महिन्याचे वेतन मिळावे, यासाठी इंटकने एसटी प्रशासनाविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
कोरोनाच्या आपत्ती काळात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. यामध्ये एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून, सुमारे ७३ कर्मचारी मृत झालेले आहेत. कोरोना कालावधीमध्ये कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असताना, कामगारांना माहे ऑगस्ट २०२० पासून वेतन दिले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण १२ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. सदर सणापूर्वी एसटी कामगारांना मागील दोन महिन्याचे थकित वेतन, माहे ऑक्टोबरचे देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे. वास्तविक एसटी कर्मचार्‍यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय तारखेस देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असतांनाही प्रशासनाकडून एसटी कामगारांना नियत देय तारखेस वेतन दिलेले नाही. दिवाळी सनापूर्वी दोन महिन्याचे थकीत वेतन तसेच ऑक्टोबरचे देय वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सण उचल मिळावी, या मागणीसाठी संघटनेने सर्व स्तरावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व एसटी कामगारांना वेतन मिळावा यासाठी दोन टप्प्यात आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच आंदोलनाचा दुसरा टप्पा सोमवार ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून एसटी कर्मचारी आपल्या राहत्या घरी आपल्या संपूर्ण कुटुंबियासह स्वगृही लाक्षणिक उपोषण करीत आपल्या व्यथा सरकार पुढे मांडणार आहेत. सोमवार ९ नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडण्याचे आवाहन संघटना नेतृत्वाकडून करण्यात आले आहे.