Breaking News

पंढरपूरमध्ये संचारबंदी आदेशाची होळी!

- मराठा आरक्षण : राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा

-  मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक


पंढरपूर/ प्रतिनिधी

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील मराठा समाज अधिक आक्रमक होत असून, मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून 7 नोव्हेंबररोजी पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपासून ते 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या संचारबंदी आदेशाची शुक्रवारी होळी केली.

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला संचारबंदी आदेश मागे घेतला नाही, तर राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरमधून मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आक्रोश मोर्चा निघेलच, असा निर्धारही मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संचारबंदी काळात पंढरपूर शहरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहराकडे जाणार्‍या सर्व बसेस बंद राहणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आक्रोश आंदोलनात गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मराठा समाजाकडून 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तशी घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुंबई येथे 30 ऑक्टोबरला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. 7 नोव्हेंबरला या मोर्चाला पंढरपुरातून सुरुवात होणार असून 20 दिवसांचा पायी प्रवास करत सर्व आंदोलक मंत्रालयावर धडक देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आली आहे. हा मोर्चा सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.

कसा असेल ‘आक्रोश मोर्चा’?

एकूण 20 दिवस हा मोर्चा असणार आहे. रोज 20 ते 25 किलोमीटर अंतर पार करण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहे. पंढरपूर ते मंत्रालय हा आक्रोश मोर्चा अकलूज, नातेपुते, बारामती, पुणे मार्गे मुंबई असा जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसह अनेक मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.