को परगावः जिल्ह्यात सर्व रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. ठिकठकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे दरदिवशी अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे....
कोपरगावः जिल्ह्यात सर्व रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. ठिकठकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे दरदिवशी अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. आश्वासने देऊन काम न केल्यामुळे नागरिकांचा संताप वाढतो आहे. यातच कोपरगाव मध्ये ग्रामस्थांनी एका महामार्गाचे काम बंद पाडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील समृद्धी महामार्गाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले असून आधी चांदेकसारे शिवारातील रस्त्यांचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. समृद्धी महामार्गचे काम करणार्या गायत्री कंपनीचे चांदेकसारे गावामध्ये ऑफिस असून एक सिमेंट मिक्सर प्लांट आहे. या कामासाठी मागील अडीच वर्षापासून अवजड वाहने ये-जा करतात. या वाहनाच्या वापरामुळे भैरवनाथ मंदिर रस्ता व गावातील इतर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धूळ आणि अवजड वाहनांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गायत्री कंपनीने चांदेकसारे ग्रामपंचायतीला सर्व रस्ते करण्याचे आश्वासन दिले होते, तसेच गावातील अनेक विकासकामे करण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले होते; परंतु त्याला ही कंपनीच्या अधिकार्यांनी केराची टोपली दाखवली. यामुळे चांदेकसारे ग्रामस्थांनी काल रात्रीपासून काम पूर्णपणे बंद पाडले आहे.