Breaking News

नाईक आत्महत्याप्रकरण भोवले; अर्णब गोस्वामीला अटक

- अलिबाग पोलिसांची कारवाईमुंबई/प्रतिनिधी

बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ’रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अलिबाग पोलिसांनी सकाळी ही कारवाई केली. अटक करण्यास गेलेल्या पोलिसांचे अटक वॉरंटदेखील यावेळी अर्णब यांच्या पत्नीने फाडल्याचे सांगण्यात आले. 

अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईनेदेखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना बुधवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले.

अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिने मे महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केलेली नाही, अशी तक्रार तिने केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्याने सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटीस पाठवली होती. मात्र, मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर बुधवारी  पोलिसांनी थेट कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने कांदिवलीहून फिरोझ शेख आणि जोगेश्‍वरी येथून नीतेश सारडा यांनाही अटक केली आहे.

अर्णब यांची अटक पत्रकारितेवरील हल्ला नाही!

रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची अटक पत्रकारितेवरील हल्ला असल्याची ओरड भाजपसह काही संघी मीडियाचे पत्रकार करत आहेत. परंतु, राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी हा पत्रकारितेवरील हल्ला नसल्याचे स्पष्ट करत, अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. जबाबदार प्रसारमाध्यम म्हणून आम्हीही पोलिसांनी कायदेशीररित्या केलेल्या कारवाईचे दैनिक लोकमंथन वृत्तपत्र समूह समर्थन करत आहे. अर्णब यांची अटक हा पत्रकारितेवरील हल्ला नसून, पत्रकारितेच्या नावाखाली अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करणारा कुणीही असला तरी त्याला कायदेशीर शिक्षा व्हावीच, असे आमचे मत आहे. 
- कार्यकारी संपादक