खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन शेनीत/प्रतिनिधी : सिन्नर-घोटी या महामार्गावरील धामणी गावाजवळ मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अतिशय...
खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन
शेनीत/प्रतिनिधी : सिन्नर-घोटी या महामार्गावरील धामणी गावाजवळ मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून वाहनधारकांसह परिसरातील शेतकरी देखील संतप्त झाले असून याच परिसरातून जाणा-या मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून या कामाची धूळ शेतकऱ्यांच्या पिकांसाठी ञासदायक ठरत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून याबाबतचे निवेदन धामणी येथील सरपंच गौतम भोसले यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत घोटी येथील समृद्धी महामार्ग कार्यालयात देण्यात येऊन सूचना करण्यात आल्या आहे. या महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी धामणी येथील शेतकरी करीत आहेत.
सिन्नर-घोटी या अतिशय महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून या महामार्गावरील वाहनधारक तसेच शेतकरी, परिसरातील नागरिक मेटाकुटीस आले असून सदर महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी तसेच नागरिक करीत आहेत. तसेच याच महामार्गालगत सुरू असलेल्या मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाच्या कामाची धूळ धामणी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर पडत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. आधीच भाजीपाला पिकांना योग्य दर मिळत नसतांना महागडी औषधे, फवारणी, तसेच मजूर आदीं खर्च करत राञंदिवस शेतात राबत भाजीपाला पिकांना पोटच्या पोराप्रमाणे जगवली असतांनाच या ठिकाणी धुळीच्या साम्राज्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून खासदार हेमंत गोडसे यांना देखील याबाबतचे निवेदन देण्यात आले असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याबाबत तातडीने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे सरपंच गौतम भोसले, शेतकरी विष्णू भोसले, वसंत भोसले, संदिप भोसले, रामदास भोसले, जगन पगारे विठोबा भोसले, ज्ञानेश्वर बालके, वसंत भिका भोसले, मुरलीधर भोसले, नारायण भोसले,ईश्वर भोसले आदींसह धामणी येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
-------------------------------
" समृद्धी महामार्गाच्या कामांस आमचा विरोध नसून फक्त शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन कामाचे नियोजन करावे यामुळे शेतकऱ्यांना विक्रिस आलेल्या भाजीपाला पिकांचे उत्पन्न घेता येईल.
- गौतम भोसले.(सरपंच, धामणी).
-----------------------------
" यावर्षी अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांनाच शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आली असून त्यातच जोमाने आलेल्या पिकांवर समृद्धी महामार्गाच्या कामाच्या धुळीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. यावर संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- भगवान भोसले.(शेतकरी, धामणी.)