कोपरगाव/शहर प्रतिनिधी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज असून, ही लाट रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे अभिप्रेत असून, नियमां...
कोपरगाव/शहर प्रतिनिधी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज असून, ही लाट रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे अभिप्रेत असून, नियमांचे पालन केले, तरच कोरोनाची ही लाट आपण रोखू शकू, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तहसील कार्यालयात मंगळवार (24) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच वाढलेलं प्रमाण ऑक्टोबर महिन्यात कमी होवून बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत भीती काहीशी कमी झाल्यामुळे अनेक नागरिक मास्क वापरत नव्हते. तसेच नुकत्याच पार पडलेल्या दसरा, दिवाळीच्या सणानिमित्ताने अनेक नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी व हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोनाची दुसरी लाट येण्याचार् शारा दिलेला आहे. देशात काही ठिकाणी दुसरी लाट आली सुद्धा असून कोरोनाचा उद्रेक वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर जावू नये, घराबाहेर जाणे अत्यंत आवश्यक असेल तर मास्क, हँडसॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. लस येणार आहे. लस कधी येणार व येणारी लस किती प्रभावीपणे काम करू शकेल याचे उत्तर आज देणे शक्य नाही. त्यामुळे अजून काही दिवस तरी नागरिकांनी संयम हा पाळलाच पाहिजे व शासनांच्या नियमांचे पालन केले पाहिजे तरच आपण दुसर्या लाटेचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतो. त्यासाठी सर्वांनी आपल्या व आपल्या कुटुंबाचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.याआढावा बैठकीसाठी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. वैशाली बडदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस उपअधीक्षक नागरे, इंगळे आदी उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन सज्ज
कोपरगाव तालुक्यात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर व 16 ऑक्सिजन बेड, 2 व्हेंटीलेटर मशीन व 2 बायपॅप मशीन, मॉनिटर, 20 के.व्ही.जनरेटर सुविधासह युक्त असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर गंभीर कोविड रुग्णालयासाठी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपल्याकडे यंत्रणा सज्ज आहे. मात्र कोविड अजून संपलेला नाही हे सर्व नागरिकांनी लक्षात घ्यावे. लवकरच लग्नसराई सुरु होत आहे त्यामुळे गर्दी होवून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी असे समारंभ टाळावे. ज्यांच्या घरी लग्न समारंभ आहे त्यांनी आपल्या भावनांना आवर घालून शक्यतो कमीत-कमी व्यक्तींच्या उपस्थितीत समारंभ करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
--------------------------------