Breaking News

सार्वजनिक बांधकाम खात्यात प्रथमच पोस्टिंगशिवाय पदोन्नती!

- आरक्षणाच्या जागेवरील अभियंत्यांचा मात्र हिरमोड
- पदोन्नती फाईल दीड महिना प्रलंबित ठेवण्याचे कारण काय?

यवतमाळ/ विशेष प्रतिनिधी

राज्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने तब्बल दोनशेवर विविध संवर्गातील अभियंत्याच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. मात्र प्रथमच सार्वजनिक बांधकाम खात्यात नियुक्त्यांशिवाय पदोन्नत्या दिल्या गेल्या आहेत. जर पोस्टिंग नाही, तर पदोन्नत्या देण्याचा घाट कशासाठी घातला जात असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पोस्टिंग असेल, तरच पदोन्नत्या देण्यात आल्या असत्या, तर त्यात काही वावगे नसते. मात्र पोस्टिंगशिवाय पदोन्नत्या देण्यामागे कुणाचा हात आहे, यात कोणते गौडबंगाल आहे, असे तर्क वितर्क सार्वजनिक बांधकाम खात्यात केले जात आहे.

बांधकाम विभागातील सहायक अभियंता रेझी-2 यांना उपविभागीय अभियंता बनविण्यात आले आहेत. त्यात 54 अभियंत्यांचा समावेश आहे. तर कनिष्ठ अभियंता श्रेणीतील 141 जणांना उपविभागीय अधिकारी बांधकाम बनविले गेले. याशिवाय दहा उपअभियंत्यांना कार्यकारी पदावर बढती दिली गेली. परंतु यापैकी कुणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. आतापर्यंत पदेान्नतीसोबतच पोस्टिंग दिली जात होती. परंतु बांधकाम खात्याच्या इतिहासात पहिल्यादांच पोस्टिंगशिवाय पदोन्नती देण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. उपअभियंता श्रेणीच्या कोट्यातील राज्यात 20 जागा रक्त होत्या. त्या पदावरील बढतीसाठी एकूण 40 अभियंते पात्र होते. या सर्वांची एकत्र पदोन्नती यादी काढली तावी, असा अनेकांचा आग्रह होता. त्यासाठी इच्छुकांनी मंत्रालयात अनेक वार्‍या देखील केल्या. परंतु शासनाने आरक्षणाच्या मुद्द्यामुळे केवळ खुल्या प्रवर्गातील दहा जणांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. पर्यायाने महत्वाच्या कार्यकारी अभियंता पदावर डोळा ठेवून असलेल्या इतर उपअभियंत्यांना पदोन्नती न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. या दहा जणांपैकी काही जण लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. गेला दीड महिना पदोन्नतीची फाईल स्वाक्षरीसाठी पडून होती. मात्र सेवानिवृत्ती जवळ असल्याने अनेकांनी मुंबईवारी टाळली. त्यामुळेच की काय, अद्याप कुणाला नियुक्त्या दिल्या गेल्या नसल्याची चर्चा आहे.

‘अर्थ’कारण की आचारसंहिता?

पोस्टिंग नसतांना देखील पदोन्नती देण्यात आल्यामुळे यामागे नेमकं काय कारण आहे, याची चर्चा सार्वजनिक बांधकाम खात्यात दबक्या आवाजात सुरु आहे. पोस्टिंग न देण्यामागे अर्थकारण आहे की, शिक्षक व पदवीधर मतदारासंघातील आचारसंहिता आहे, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रत्यक्षात यामागे ‘अर्थ’कारण असल्याची चर्चा सुरु असून, फाईल दीड महिना प्रलंबित ठेवण्यामागील रहस्य काय, याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. 

----------------------