Breaking News

बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत!

 तेजस्वींचे सत्तेचे स्वप्न भंगले

नीतीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री

विधानसभा निवडणूक निकाल
एनडीए - 125
महाआघाडी - 110
लोजपा  - 01
अन्य - 07
एकूण - 243
(बहुमतासाठी आवश्यक 122)

पाटणा/ प्रतिनिधी

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल तब्बल 18 तासांनी बुधवारी पहाटे 3 वाजता जाहीर झाला. या चुरशीच्या लढाईत भाजपा-जेडीयूच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विधानसभेच्या 243 जागांपैकी 122 जागांचा बहुमताचा जादुई आकडा गाठला. तर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधन आघाडीला 110 जागा जिंकता आल्या. यामुळे बिहारमधील सत्तांतराचे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत जनेतेचे आभार मानले.

बिहारमध्ये एनडीएने जिंकलेल्या सर्वाधिक जागांवर भाजपचा विजय झाला आहे. भाजपला 72 आणि जेडीयूला 42 जागा जिंकता आल्या आहेत, तर व्हीआयपी आणि एचएएमचा प्रत्येकी 4 जागांवर विजय झाला आहे. अशा मिळून एनडीएने 122 जागा जिंकल्या आहेत. तसेच महागठबंधनच्या जागांपैकी आरजेडीने सर्वाधिक 75 जागा जिंकल्या असून काँग्रेसने 19 आणि डाव्या पक्षांनी 16 जागा जिंकल्या आहेत. महागठबंधनने एकूण 110 जिंकल्याने बहुमत मिळवता आलेले नाही. तर एमआयएमने 5 जागा जिंकल्या असून बसपा, एलजेपी आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सर्वाधिक 75 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली होती. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मतमोजणीसाठी आयोगाने काही नियम बदलले होते. त्यामुळे मतमोजणीस उशीर झाला. बुधवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास निवडणुकीचे निकाल हाती आले आणि बिहारमधील एकूण चित्र स्पष्ट झाले. एनडीएच्या बहुमताच्या दाव्यासह  सातव्यांदा नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारमध्ये राजदला हटवून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या नीतीश कुमार यांनी सत्ता हातातून जाऊ दिली नाही. 2005 मध्ये बहुमत घेऊन नीतीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र 2000 च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, काही दिवसांत त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडले होते.