Breaking News

मिलिंद नार्वेकरांनी केले गडाखांचे सांत्वन

 - गौरी गडाखांच्या आत्महत्येचे गूढ कायम?


अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी

गडाख कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचे सचिव तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे सोनई येथे गेले होते. यावेळी त्यांनी प्रशांत गडाख यांच्यासह जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व कुटुंबीयांचे सांत्वन केले. गौरी प्रशांत गडाख यांनी शनिवारी सायंकाळी नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्ये मागचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. गौरी यांच्या माहेरकडील कुटुंबीयांनी यासंदर्भात अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. 

सौ. गौरी प्रशांत गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी होत्या. त्या लोणी येथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत्या. गडाख कुटुंबाच्या कठीण काळात त्यांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर सोनाईला गेले होते. याप्रसंगी नार्वेकर यांनी गडाख कुटुंबीयांचे सांत्वन करत प्रशांत गडाख यांच्याशीही चर्चा केली. गौरी यांच्या पश्‍चात पती प्रशांत गडाख, नेहल आणि दुर्गा या दोन मुली आहेत. त्या  समाजकारणात सक्रिय होत्या. अनेक समाजोपयोगी उपक्रमही त्यांनी राबवले होते. त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सोनई येथे रविवारी सायंकाळी गौरी गडाख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना पुतणे उदयन गडाख यांनी अग्नी दिला होता. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत मात्र जिल्ह्यात सद्या विविध चर्चा सुरु आहेत.


आ. संग्राम जगताप, भाऊ कोरगांवकरही उपस्थित

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे शिवसेना कोट्यातून कॅबिनेट मंत्री असल्याने शिवसेनेच्यावतीने सांत्वन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे  सरचिटणीस  मिलिंद नार्वेकर व नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी सोनई येथे जाऊन गडाख कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या वेळी आमदार संग्राम जगताप,जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, संभाजी कदम, संजय शेंडगे, गिरीश जाधव, नगरसेवक सचिन शिंदे, मंदार मुळेआदी उपस्थित होते. त्यानंतर मिलिंद नार्वेकर, भाऊ कोरगावकर व आमदार संग्राम जगताप हे हेलिकॉप्टर ने मुंबई च्या दिशेने रवाना झाले .

-------------------------