मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, अनिल परबांचा खळबळजनक आरोप मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तया...
मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, अनिल परबांचा खळबळजनक आरोप
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आकड्यांची जुळवाजुळव कशी करायची यापासून ते युती आघाडी कोणासोबत करायची याबाबत उभयबाजू तयारी करत आहेत.
नुकतेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर गंभीर आरोप केलेत. मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहित नाही. मात्र मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, असे सांगत मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय.
मनसेला कुणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. आज ना उद्या कुणाची तरी सुपारी घ्यायची आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडं नागडं केलं. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अशी खिल्ली अनिल परब यांनी मनसेची उडवली आहे.
हे काय चाललंय ती वेगवेगळी समीकरणं असतील तरी मुंबई महापालिका निवडणुकीला आम्ही समर्थपणे समोरं जाऊ आणि मला विश्वास आहे आम्ही निवडणुकी जिंकू. महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार का या प्रश्नाला बोलताना परब म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणूक कशी लढवली जाणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. असंही अनिल परब म्हणाले.