Breaking News

फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी!

- ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक धक्का
- फडणवीस सरकारच्या काळात वाढली वीजबिलाची थकबाकी


मुंबई/ प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यामुळे वीज बिलावरून शॉक देणार्‍या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच झटका दिल्याचे बोलले जात आहे.

गुरूवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारच्या काळातील वीजबिलांची थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी ऊर्जामंत्री नितीन राऊतांची संपूर्ण आकडेवारीसह थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील माहिती सादर केली होती. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. एकीकडे भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत असताना, दुसरीकडे ऊर्जामंत्र्यांनी उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील वीज बिलांच्या थकबाकीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्‍यांच्या कृषी पंप वीज बिलासंदर्भात निर्णय घेण्यात आला त्यानंतर इतर वीज बिलांबाबतही चर्चा सुरु होती. त्यावेळी फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीसंदर्भात माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप

वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप असा वाद आता रंगताना दिसत आहे. वीज बिले कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरले, हे विश्‍वासघातकी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा पलटवार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. भाजपची सत्ता राज्यात असताना 5 वर्षात महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. सोमवारी भाजप यासंदर्भात राज्यात आंदोलनही करणार आहे.