अकोले/प्रतिनिधी ः अकोले नगरपंचायतीचा लोकनियुक्त पदाधिकार्यांचा कार्यकाळ बुधवारी संपल्यामुळे नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली....
अकोले/प्रतिनिधी ः अकोले नगरपंचायतीचा लोकनियुक्त पदाधिकार्यांचा कार्यकाळ बुधवारी संपल्यामुळे नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोले नगरपंचायतीत 2015 ते 2020 कार्यकाळातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला. नवीन पदाधिकारी निवडून येईपर्यंत नगरपंचायतवर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे हे काम पाहणार आहेत. नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रभाग व आरक्षण सोडत जाहीर झालेली करण्यात आली आहे. या आरक्षण व प्रभागरचनेवर हरकती मागावल्या होत्या त्याची मुदत गुरूवारी संपली. आता 24 डिसेंबर 2020 रोजी अंतिम आरक्षण व प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अकोले नगरपचायंतीचे 17 प्रभाग निहायपैकी 9 प्रभागात महिलांच्या जागा आरक्षित झाल्या आहे. शहरातील सर्व 17 प्रभागात इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे. निवडणुकीसाठी अकोल्यात राजकीय जुळवाजुळवींसाठी हालचाली सुरू आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या ताब्यात सध्या अकोले नगरपंचायत आहे. मात्र ही नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून ताकद लावली जात आहे. राज्यात सत्ता असताना तालुक्यात नगरपंचायत मध्ये सत्ता नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तालुक्यात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. काँग्रेसने सवता सुभा मांडला आहे. तर शिवसेनेनेही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणी शिवसेना महाविकास आघाडी आहे ती आघाडी अकोले तालुक्यात कितीपत टिकते याकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीची बिघाडी झाल्यास पिचड यांना फायदाच होणार आहे. या दृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे.