श्रीनगर/ प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली अस...
श्रीनगर/ प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, त्यांची कन्या इल्तिजा हिला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. स्वत: मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
मला पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे अटक करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीर प्रशासन मला पुलवामामध्ये जाऊन पक्षाचे नेते वहीद उर रहमान यांच्या कुटुंबाला भेटू देत नाही. भाजपचे मंत्री आणि मित्रपक्षाचे नेते राज्यात कुठेही फिरत आहेत. फक्त माझ्याबाबतीतच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो का?, असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. पीडीपीचे नेते वहीद उर रहमान यांना तथ्यहिन आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. मला त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचे आहे. पण भेटू दिले जात नाही. माझी मुलगी इल्तिजालाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तिलाही रहमान यांच्या कुटुंबीयांना भेटायचे होते, असे मुफ्ती यांनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे. जम्मू-काश्मीरला पुन्हा स्वायत्ता मिळून देण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासह माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक पक्ष एकत्र आले आहेत. अब्दुल्ला यांनी तर काश्मीरप्रश्नात चीनची मदत घेणार असल्याचीही भाषा केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, या नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.