पंढरपूर/ प्रतिनिधी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली. याव...
पंढरपूर/ प्रतिनिधी
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्याहस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ आणि जय ही त्यांची दोन्ही मुलंही उपस्थित होती. तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी कोरोनातून मुक्ती मिळो, असे साकडे अजित पवार यांनी विठ्ठलाला घातले.
कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरीत विठ्ठल रूक्मिणी मंदिरात महापूजा कार्यक्रमाला मध्यरात्री उशीरापासूनच सुरूवात झाली. 1 ते पाऊणे दोन दरम्यान विठोबा-रखुमाईची पाद्य पूजा, तसेच नित्य पूजा करण्यात आली. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल मंदिरात आगमन झाले. पहाटे अडिच ते 3 अशी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे 3 ते 3:30 दरम्यान, रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर पाऊणे चार ते सव्वाचार दरम्यान मानाच्या वारकर्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील डौलापूर येथेली कवडूजी बोयर आणि कुसुमबाई भोयर या दाम्पत्याला पुजेचे मानकरी म्हणून मान मिळाला. हिंगणघाटमधील डौलापूरचे कवडूजी भोयर गेल्या दहा वर्षांपासून वीणेकरी म्हणून विठ्ठलाची सेवा करत आहेत. तर वयाच्या सातव्या वर्षापासून कवडूजी नित्यनियमाने पंढरपूरची वारी करत आहेत. देवाची महापूजा करण्याचा मान मिळाला हे सेवा केल्याचे फळ असल्याची भावना भोयर दाम्पत्याने व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडक मान्यवरांनाच मंदिरात महापूजेसाठी प्रवेश देण्यात आला होता.