Breaking News

अर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत

- जामीनअर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी

- अर्णव गोस्वामींकडून हरिश साळवेंचा युक्तीवाद 


मुंबई/ प्रतिनिधी

रिपब्लिकन टीव्हीचे संपादक व अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी अर्णब गोस्वामी यांचा गुरुवारचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे. त्यांनी दाखल केलेल्या मुंबई उच्च न्यायालयातील जामिनावरील सुनावणी टळली असून, शुक्रवारी पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामींचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. प्रसिद्ध विधिज्ज्ञ हरिश साळवे हे अर्णव यांची बाजू लढत आहेत. तर पोलिसांनीही अर्णबची न्यायालयीन कोठडी रद्द करून पोलिस कोठडी देण्याची मागणी केली आहे.

अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना गुरुवारी मुंबई हायकोर्टाकडून तातडीचा दिलासा मिळू शकला नाही. आता तक्रारदार आणि राज्य सरकारचे उत्तर आल्यानंतरच शुक्रवारी अर्णब यांच्या जामीनअर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब यांना आजची रात्रही न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. दरम्यान, अलिबाग न्यायालयातील जामीनअर्ज अर्णब यांच्या वकिलांनी मागे घेतला आहे. दोन ठिकाणी जामीनअर्ज दाखल केल्याने सुनावणीबाबत अडचण होण्याची शक्यता होती. त्यामुळे अलिबाग न्यायालयातील जामीनअर्ज मागे घेतला गेला. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी बुधवारी रात्री दिले. यानंतर तिन्ही आरोपींची रवानगी अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेलमध्ये करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग मध्यवर्ती कारागृहाने नगरपालिकेच्या शाळा इमारतीत क्वारंटाईन सेल स्थापन केला आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

--

अर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले

अलिबाग : अर्णब गोस्वामी यांना काल अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले आणि फोन बंद करण्याचे निर्देश दिले. यावेळी अर्णब गोस्वामींनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांना पुन्हा पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांना मारहाण झाल्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

--------------------------------