साताराः लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपारिक शाही विवाह सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भा...
साताराः लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपारिक शाही विवाह सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. मंदिरात मोजक्याच पुजार्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने विधीपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान मंदिर संस्थानने दिली आहे.
दर वर्षी तुलसी विवाह दिनाला सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित होत असतो. यंदा हा विवाह सोहळा सालकरी पुरोहित व मंदिराचे पुजारी व मानकरी यांच्या मोजक्याच उपस्थितीत पार पाडणार आहे. या सोहळ्याला भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येण्यास मनाई आहे. मंदिराचे सर्व दरवाजे बंद करून पोलिस बंदोबस्तात हा सोहळा होईल. कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी सरकारने ही पावले उचलली आहेत.
परगावच्या भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन देवस्थानने केले आहे. म्हसवड शहर व परिसरातील भाविकांनी मंदिर व मंदीर परिसरात न येता सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाहेरगावच्या व स्थानिक भाविकांनी याची नोंद घेऊन सरकार व मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिद्धनाथ देवस्थानकडून करण्यात आले आहे.
रथयात्रा 15 डिसेंबरला नेहमीप्रमाणे होणार, की नाही याबाबत भाविक संभ्रमात आहेत; मात्र यावर सरकार काय निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही होईल, असेही देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले.