मुंबई - शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय ...
मुंबई -
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर शरसंधान साधलेआहे. यावेळी ईडीची कारवाई 'ऑपरेशन लोटस'चा भाग असू शकते, असे मोठे विधान केले आहे.
तसेच,'गेल्या काळात मी भाजपविरोधात बोललो तर माझ्या अंगावर केस टाकली. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना ईडीने नोटीस दिली. लोकांना आता माहिती झाले आहे की, भाजपविरोधात कुणी बोलले तर त्यांना त्रास देण्यासाठी संस्थांचा वापर होतो. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय', असा हल्लाबोल ही छगन भुजबळ यांनी केला आहे.
'अर्णव गोस्वामी प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तसेच कंगनाच्या प्रकरणात सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपविरोधात जो आक्रमकपणे बोलतो त्याला विविध मार्गाने त्रास दिला जातो. सरनाईकांवरील कारवाईचा मला अंदाज होता. जसे वाटले तसेच घडले, असे भुजबळ म्हणाले आहे. 'भुजबळ भाजविरोधात जास्त बोलले की छापेमारी आणि केसेस, पवारसाहेबांनी निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली तर नोटीस, अशी दडपशाही भाजपने केली. भाजपला जरी ही दडपशाही वाटत नसली तरी लोकशाहीच्या दृष्टीने ही दडपशाहीच आहे. भाजपच्या एकाही नेत्याला का बरं ईडीची नोटीस गेली नाही?', असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ईडी, सीबीआय हे भाजपचे बाहुले आहेत. भाजपने संस्थांना हाताशी धरुन सत्तांतराचा कितीही प्रयत्न करु देत महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच आणि फक्त 5 वर्षाचा कार्यकाळ नाही तर पुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.