त्र्यंबकेश्वर/प्रतिनिधी आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर दर्शनासाठी गर...
त्र्यंबकेश्वर/प्रतिनिधी
आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नसला तरीही उंबर्यापासुन का होईना नाथांच्या समाधीचे दर्शन घडल्याने वारकर्यांनी समाधान व्यक्त केले आणी एवढ्यात कुठुन तरी तुकोबारायांच्या अंभंगाच्या ओवी कानावर पडल्या 'पाहीन श्रीमुख आवडीने....'
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर १८ मार्च पासुन राज्यातील इतर मंदिरां प्रमाणे येथील भगवान त्र्यंबकेश्वराचे आणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. जवळपास आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर दिपावली पाडव्याच्या दिवशी मंदिरे उघडण्यात आली. भागवत धर्माचे आद्य प्रवर्तक तसेच ज्ञानोबा माऊलींचे जेष्ठ बंधु तथा गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे येथे संजीवन समाधी मंदिर अाहे. दररोज नित्यनेमाने भाविक येथे दर्शनासाठी येतातच मात्र एकादशीचे दिवशी त्यातल्या त्यात वद्य पक्षातील एकादशीला भागवत भक्तांची मोठी गर्दी असते. मंदिर उघडल्यानंतरची ही पहिलीच एकादशी, चातुर्मास समाप्ती तसेच पंढरपुर येथे संचारबंदीसह श्रीमुख दर्शन देखील बंद असल्याने आज भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दि केली होती. नाथांच्या संजिवन समाधी वेळी साक्षात पांडुरंगाने आपल्या हाताने नाथांना समाधी स्थळी बसवले, असे समकालीन व त्याप्रसंगी उपस्थित असलेले संत नामदेव महाराजांनी समाधी सोहळ्याचे यथार्थ वर्णन आपल्या अभंगातुन केले आहे. त्यामुळे श्री पांडुरंगाचा चरणस्पर्श या स्थळाला झाल्याने या क्षेत्राचे विशेष महत्व आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासनाने आखुन दिलेल्या नियमांनुसार मंदिरातील मुर्तींना हात लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यानुसार भाविकांना गर्भगृहा मध्ये जाण्यास बंदि करण्यात आली असुन गर्भगृहाच्या उंबर्यापासुनच भाविक दर्शन घेतांना दिसत होते. शासनाच्या अटी - शर्तीचं तंतोतंत पालन करुन भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर श्रीमुख दर्शन घडल्याने वैष्णवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सकाळ पासुन दुपारी तिन वाजेपर्यंत जवळपास ८०० भाविकांनी नियमांचं पालन करीत नाथांच्या समाधीचं दर्शन घेतले.