Breaking News

कोल्हापुरात शेतकर्‍यांची विराट ट्रॅक्टर रॅली

 अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटल्यानेमोदींची शेतकर्‍यांवर वक्रदृष्टी!

- पृथ्वीराज चव्हाणांची केंद्रावर टीका

कोल्हापूर/ प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले आहे. त्यामुळे सरकारी कंपन्या विकण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. म्हणूनच त्यांची वक्रदृष्टी आता शेतकर्‍यांवर पडली आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात काँग्रेसने कोल्हापुरात विराट ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. 

गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात ही शेतकरी रॅली निघाली होती. या रॅलीत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते व बहुसंख्य शेतकरी सामिल झाले होते. या रॅलीला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावरून भाजपला घेरले. शेती हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे हा विषय राज्यांकडे सोपवण्यात आला होता. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने दिल्लीत बसून बादशाही निर्णय होऊ नये म्हणून हा विषय राज्यांकडे देण्यात आला होता, असे सांगतानाच मात्र, केंद्राने तरीही कृषी विषयक कायदे केले आहेत. हे कायदे करताना विरोधकांशी चर्चा केली होती का? विरोधक सोडा. तुमच्या मित्रपक्षांना तरी विचारले होते का? असा सवाल करतानाच हम करे सो कायदा हा मोदींचा स्वभाव आहे. हा त्यांचा हट्टीपणा आहे. त्यामुळेच त्यांनी हा कायदा दामटून नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील मोदींचे नियंत्रण सुटले आहे. त्यांना सरकारी कंपन्या विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच त्यांची वक्रदृष्टी शेतकर्‍यांवर पडली असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी सतेज पाटील यांनी ही शेतकर्‍यांना कृषी कायद्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. आता आपण गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असेही राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील म्हणाले. यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. हा पेटलेला वणवा केंद्र सरकाला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच एक दिवस आपला येईल. तो दिवस शेतकर्‍यांचाच असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षी नवे रोजगार निर्माण केले जात असल्याचा दावा केला जात असून, प्रत्यक्षात काहीही घडताना दिसत नाही. त्यामुळेच बिहारमध्ये मोदींच्या सभेला शेतकरी फिरकलेही नसल्याचा यावेळी करण्यात आला. मोदींना व्यापार्‍यांचे कर्ज माफ करायला वेळ आहे. पण शेतकर्‍यांचे कर्ज माफ करायला वेळ नाही, असे सांगतानाच शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींना शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.