महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दुफळी?, थोरातांनी टोचले चव्हाणांचे कान! - महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची...
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दुफळी?, थोरातांनी टोचले चव्हाणांचे कान!
- महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा
- वीजबिल माफीवरून काँग्रेसमध्ये दोन प्रवाह
मुंबई/ विशेष प्रतिनिधी : वाढीव वीज बिलाचा मुद्दा आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केल्यावरून राज्यात रान पेटले आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्तीच्या दिवशी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. राऊत यांची घोषणा चूक होती, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले असताना, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऊर्जामंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच तशी घोषणा केली होती. हे चव्हाणांना माहिती नसावे, अशा शब्दांत चव्हाणांचे कान उपटले आहेत.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली होती. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांचे कान टोचले आहे. नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ही मंत्रिमंडळ सहकारी समवेत चर्चा करूनच केली होती, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. वीजबिल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा करूनच ऊर्जामंत्री निती राऊत यांनी घोषणा केली होती. याबाबत कदाचित अशोक चव्हाण यांना माहिती नसावी, असेही ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. नितीन राऊत यांनी वीज बिल सवलतीची घोषणा करण्याआधी मंत्रिमंडळातील सहकार्यांसमवेत चर्चा समवेत करायला हवी होती. त्यानंतर घोषणा होणे गरजेचे होते, असे वक्तव्य केले होते. त्यावरून थोरात यांनी आता चव्हाण यांनाच फटकारले आहे.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
अशोक चव्हाण म्हणाले होते की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीबाबत घोषणा करण्याच्या आधी मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत चर्चा करायला हवी होती. चर्चा न करता त्यांनी घोषणा केली. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. राज्यात आर्थिक स्थिती बिकट असताना त्यात वीजबिल माफी बोजा सोपा नाही. यामुळे सरकार वीज ग्राहकांना दिलासा देऊ शकत नाही, असे सांगून अशोक चव्हाण यांनी नितीन राऊत यांच्यावरच नाराजी व्यक्त केली. किती काळ सरकार टिकेल यावर बोलताना चव्हाण यांनी भाजप अपप्रचार करत आहे. भाजपचे काही नेते सत्तेपासून दूर राहू शकत नाही, असा टोला त्यांनी फडवणीसांना लगावला होता.