Breaking News

संजय राऊत म्हणतात, 'ती' पक्षाची अधिकृत भूमिका नाही मुंबई: शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्सचं नाव बदलण्याची मागणी केली. यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कराची स्वीट्सचं नाव बदलण्याची मागणी निरर्थक असल्याचं म्हणत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं राऊत म्हणाले. त्यामुळे या विषयावर शिवसेनेत संभ्रम आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


शिवसेना नेते नितीन नांदगावकर कराची स्वीट्समध्ये जाऊन दुकानाचं नाव बदलण्याची मागणी केली. 'मला कराची शब्दाचा तिरस्कार वाटतो. कारण ते पाकिस्तानातलं शहर आहे. मी तुम्हाला काही वेळ देतो. तुम्ही दुकानाचं नाव बदला,' असं नांदगावकर यांनी दुकानाच्या मालकांना सांगितलं. त्यावर आमचे पूर्वज पाकिस्तानात आले होते, असं उत्तर मालकांनी दिलं. यानंतर नांदगावकरांनी तुमचं इथं स्वागतच आहे. पण तुम्हाला दुकानाचं नाव बदलावं लागेल. तुम्ही हवं तर तुमच्या पूर्वजांचं नाव दुकानाला द्या, असं मालकांना सांगितलं.

या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 'कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कराची स्वीटविरोधात मनसे आक्रमक
मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला आहे. या आस्थापनांच्या मालकांना मनसे थेट कोर्टात खेचणार आहे. मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी 'कराची स्विट्स'च्या व्यवस्थापकांना नोटीस पाठवली आहे.

मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक पवित्रा घेतला. पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराची शहराच्या नावाने मुंबईत दुकान चालवण्यास मनसेने आक्षेप घेतला आहे. याबाबतच पत्र देखील हाजी सैफ शेख यांनी दुकानाच्या व्यवस्थापकांना पाठवलं आहे.


'देशाचा पारंपारिक शत्रू देशाची राजधानी 'कराची' या नावाचा आधार घेत मुंबईत 'कराची स्विट्स' नावाची दुकानं सुरू करुन भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचवून व्यवसाय केला जात आहे. तसेच मराठी भाषेचा द्वेष केला जात आहे', असं मनसेचे नेते हाजी सैफ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हाजी सैफ यांनी याबाबत कराची स्विट्सच्या व्यवस्थापकांना कोर्टात खेचणार असल्याचंही म्हटलं आहे.