Breaking News

कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा प्रस्ताव

 - जिल्हा प्रशासनाविरोधात काही वारकरी संघटना एकवटल्या


पंढरपूर/ प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक साजरी करावी, असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. बाहेरुन येणार्‍या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नको, असे या प्रस्तावात म्हटले आहे. परंतु या प्रस्तावाला पंढरपुरातील काही वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. या वारकर्‍यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करा, असे पटोले यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे संकट पाहता 24 नोव्हेंबर रोजी होणारी कार्तिकी यात्राही आषाढी प्रमाणे प्रतिकात्मक करावी. यात्रा कालावधीच्या प्रमुख दिवशी 7 ते 8 लाख लोकांची गर्दी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट येथे केंद्रित झाल्यास कोरोनाचा मोठा धोका होऊ शकेल. यामुळे कार्तिकीला कोणत्याही दिंड्याने अथवा वारकर्‍यांना पंढरपूरमध्ये प्रवेश नको, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी 8 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळींनी काल (18 नोव्हेंबर) मुंबईत विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. यामध्ये मर्यादित स्वरुपाच्या यात्रेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वारकरी संप्रदायाचे वतीने सांगण्यात आले. दरम्यान, राज्यातील मंदिरे उघडली असली तरी कोरोनाचा धोकाही संपलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. आषाढी यात्रेप्रमाणे संचारबंदीमध्ये कार्तिकी यात्रा होणार की नाना पटोले यांच्या मध्यस्थीने मर्यादित स्वरुपात कार्तिकी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.