Breaking News

लव्ह जिहादवरून महाविकास आघाडीत कोंडी!

- हिदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेला घेरणार
- लव्ह जिहादविरोधी कायद्याला काँग्रेसचा विरोध

मुंबई/ प्रतिनिधी

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा आणल्यानंतर आता महाराष्ट्रात या मुद्द्यावर भाजप हा पक्ष महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे कायदा करावा, अशी भाजपाने मागणी केली असता, या कायद्याची गरज नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे, त्यामुळे भाजपाने शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन डिवचले आहे. तर शिवसेनेची राजकीय कोंडी झाली आहे.

याबाबत काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख म्हणाले की, लोकांचे हाल होत आहेत, नोकर्‍या मिळत नाही, लोक आत्महत्या करत आहेत, त्याकडे लक्ष देण्याऐवजी गाय वाचवण्यासाठी कायदा करणे, स्वत: मुख्यमंत्री असताना गौशाळेत अनेक गाई उपाशी मेल्या होत्या. लव जिहाद सोडा, महिलांना सुरक्षा, नोकर्‍या कशा मिळणार, कोरोनातून कसे सावरणार याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे लव जिहाद सारख्या फालतू गोष्टींना महाराष्ट्रात थारा नाही, लव जिहाद विरोधी कायद्याची गरज नाही, असे मत त्यांनी मांडले. तर महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेस नेते जे वक्तव्य करत आहेत, लव जिहादच्या नावाखाली महिलेवर अन्याय करणे,  तिचा जीव घेणे, याचे शिवसेना समर्थन करतेय का? बाळासाहेब ठाकरेंनी लव जिहादबद्दल जे मत मांडले होते, ते सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना नेते बाळासाहेबांच्या विचारांना विसरले का? कुठे गेले शिवसेनेचे हिंदुत्व? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मध्य प्रदेशात धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020 आणण्याची तयारी सुरु आहे. लवकरच हे विधेयक विधानसभेत आणले जाईल. यात प्रलोभन, फसवणूक आणि बळजबरीने लग्न केल्यास दोषींवर 5 वर्षांची कठोर कारवाई होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्यातील दोषींना जामीन मिळणार नाही. तसेच हा गुन्हा करणार्‍या माणसाला मदत करणार्‍या व्यक्तीलाही अशाच प्रकारे शिक्षा होणार आहे. या प्रकरणात तक्रार करणे गरजेचे आहे. लग्नासाठी धर्मांतर केलेल्या जोडप्यांनी एक महिन्याच्या आत स्थानिक जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे माहिती देणे आवश्यक आहे. हे विधेयक पुढच्या अधिवेशनात मांडले जाईल, असे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

मध्यप्रदेशात येणार लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा

मध्य प्रदेशात शिवराज सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यासाठी विधेयक आणणार आहे. या विधेयकानुसार फसवणूक करून लग्न केल्यास 5 वर्षाची जेलची हवा खावी लागणार आहे. लव्ह जिहाद प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येईल आणि लव्ह जिहाद सिद्ध झाल्यास लग्न रद्दही होणार आहे. 

-------------------