Breaking News

अग्रलेख / विधानपरिषद आणि शरद पवारांची खेळी!

 अग्रलेख

विधानपरिषद आणि शरद पवारांची खेळी!

राज्यातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा आणि पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा आपले मुरब्बी राजकारण सिद्ध करत आहेत. काँग्रेस व शिवसेना हे दोन वेगळे व स्वतंत्र पक्ष असले तरी या पक्षांच्या धोरणावरदेखील पवारांचा पगडा दिसून येतो. विधानपरिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधानपरिषदेवर नियुक्ती करत असतात. त्यात तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. परंतु, या जागा भरतानादेखील राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले राजकीय समिकरण साधण्याचा प्रयत्न पवार करत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत ठरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते यशवंत भिंगे यांना विधानपरिषदेत जाण्याची संधी देऊन पवारांनी चव्हाणांबरोबरच काँग्रेसलादेखील खिजवले आहेच; पण राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक ठिकाणी मते कापणार्‍या वंचित बहुजन आघाडीलादेखील कामाला लावले आहे. प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांना विश्‍वासघातकी राजकारणावरून सातत्याने उघडे पाडत असतात. त्यामुळे आंबेडकरांचीच मोठ्या प्रमाणावर मते घेणारी माणसे पवारांनी या फोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेही विधानसभा निवडणुकीनंतर वंचित आघाडीचे राजकीय पाठबळ कमी करण्यासाठी आमच्याकडून दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना जवळ करू, असे विधान पवारांनी एकवेळ केले होते. त्याचवेळी पुढील काळात ते आंबेडकरांचा जनाधार कमी करण्यासाठी प्रयत्न करतील, हे स्पष्ट झाले होते. आता जी काही पवारांची पाऊले पडत आहेत, ती पाहाता पवार हे आंबेडकरांच्या राजकारणाला सुरुंग लावण्याची तयारी करत आहेत, हे स्पष्ट होते. विधानपरिषदेसाठी मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता, तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जात आहे. त्यामुळे राज्यपाल भाजपच्या धोरणाने निर्णय घेतात, की पवारांच्या खेळीला बळी पडतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपासून बहुजन समाजातील अनेक छोट्या मोठ्या जाती दूर गेल्या होत्या. हा दूर गेलेला समाजघटक पुन्हा जोडण्याचा प्रयत्न शरद पवार हे आता करत आहेत. त्यासाठी छोट्या जातसमूहातील नेत्यांना कोणतीही छोटी - मोठी पदे देऊन काम भागवले जात आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा भाजपचा मोठा नेता फोडून वातावरण निर्मिती होईल, पण मतांची आणि जागांची बेगमी तेवढ्या मोठ्या प्रमाणात होईलच; याची खात्री पवारांना आजही वाटत नाही. त्यामुळे ते अधिक सावधपणे पाऊले टाकत आहेत. छोटे पक्ष फोडून आणि दुय्यम नेते गळाला लावून जेवढा मतांच्या बेगमीचा फायदा होईल, तेवढा पवारांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निमित्ताने पवारांनी पक्षातील व पक्षाला समर्थन देणार्‍या दिग्गजांना डावलून विधानपरिषदेत यशवंत भिंगे आणि आनंद शिंदे यांना पाठविण्याची खेळी चालवली आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील धनगर आणि मुंबईतील दलित समाज जोडण्याचा पवारांचा हा प्रयत्न आहे. भिंगे हे वंचित बहुजन आघाडीकडून नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. त्यांनी निर्णायक मते घेतल्यानेच काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भिंगे किंवा शिंदे यांच्या यशाची टक्केवारी कितीही कमी राहिली तरी सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवस्थेशी ती ताडून बघता, ती फायद्याचीच राहील; कारण हे समाज घटक पवारांपासून पुरते दूर गेले आहेत. हे दोन्ही समाज घटक राष्ट्रवादीकडे फारसे कधी नव्हतेच. पण जे मिळायचे ते मिळेल या हेतूने भिंगे आणि शिंदे यांच्या उमेदवारीकडे राष्ट्रवादी पाहताना दिसते आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांचेही नाव सूचविण्यात आले. शेट्टी हे जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेवर गेले तर त्याचाही राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच होणार आहे. खास करून साखरपट्ट्यात शेट्टी यांची राजकीय ताकद पाहाता, पवारांना ही राजकीय ताकद फायद्याची ठरेल, अशी अटकळ कदाचित पवारांनी बांधलेली असावी. पवार हे नेहमीच बेरजेचे राजकारण करत आले आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी ठरलेला असताना, केवळ पवारांच्या बेरजेच्या राजकारणामुळेच राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकली. सद्या शरद पवार हे राज्यातील सर्वात मोठे नेते आहेत. परंतु, पवार आहेत त्यापेक्षा बरेच अधिकही  मोठे होऊ शकले असते. पण एकाच वेळी राजकारणही करायचे आणि दुसरीकडे सकारात्मक समाजकारण करायचे; एकीकडे व्यापक भूमिका मांडायची आणि दुसरीकडे गटबाजीत गुंतायचे; डाव्होससारख्या परिषदेला उपस्थित राहुन ग्लोबल इमेज बनवायची पण लोकल बाबींत अडकायचे, अशा परस्परविरोधी भूमिका करण्यात ते गुंतले. यात भर पडली ती वादग्रस्त मामल्यांशी त्यांचे नाव घेतले गेले. सोयीस्कररीत्या मौन पाळणे ही पवारांची खासियतही त्यांना घातक ठरली. खरे म्हणजे पवार जातीपातीच्या पलिकडे जाणारे नेते, पण गेल्या दशकभरात काही मराठा संघटनांनी घेतलेली संकुचित भूमिका पवारांच्या मूक पाठिंब्याशिवाय शक्य नाही, असे बोलले जाणे हे पवारांचा पराभव करणारे ठरले. आतादेखील ते सामाजिक समिकरणे बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्यासाठी ते हाती येईल ती संधी साधण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर पवार हे राज्यातील मोठीच राजकीय शक्ती आहे. त्यांना वगळून राज्याचे राजकारण पूर्ण होऊच शकत नाही. पवार ही काय ताकद आहे हे 2019 च्या निवडणुकीच्या निमित्ताने तरुणपिढीने अनुभवले आहेच. ‘सगळे संपले असे जेव्हा वाटते तेव्हा शरद पवारांसारखे लढायला शिका’, हे वाक्य देशाच्या तरुणांचे ब्रीदवाक्य ठरले आहे. बलाढ्य शक्तीला हिंमत, स्वाभिमान आणि कौशल्याच्या जोरावर मात देता येते, याचा वस्तुपाठ यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रासह देशासमोर ठेवला. अफाट कार्यक्षमता, स्मरणशक्ती, सामाजिक भान, दुर्दम्य इच्छाशक्ती हे शब्द पवारांना समानअर्थी वापरले जातात. महाराष्ट्राचा भूगोल तळहातावर घेऊन राज्याच्या हितासाठी अविरत कष्ट करणारा हा नेता इतिहास निर्माता आहे. त्यामुळे कसे का होईना राज्यात सत्ता मिळविण्यात यश मिळाल्याने, आहे त्या संधीचा फायदा घेऊन शरद पवार आपला पक्ष भरभक्कम करणार नाही; असे कधी होईल का?

--------------------