Breaking News

इतक्या पराभवानंतरही काँग्रेस सुधारणारच नाही का?

 अग्रलेख

इतक्या पराभवानंतरही काँग्रेस सुधारणारच नाही का?


बिहार
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये नैराश्य निर्माण झाल्याचे दिसत असून, अशा परिस्थितीत हे नैराश्य झटकून कार्यकर्ते व नेते यांच्यात चैतन्य निर्माण कऱण्यासाठी कुणीही नेतृत्व पुढे येताना दिसत नाही. त्यातच कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते या पराभवाचे खापर अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांच्यावरच फोडताना दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांची जी वक्तव्ये येत आहेत; ती पाहाता काँग्रेसला आता राष्ट्रीय पातळीवरील ऐतिहासिक पक्ष म्हणून काही महत्व उरले की नाही? असा प्रश्‍न निर्माण होतो. बिहार निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीवर काँग्रेसचे नेतृत्व चर्चा करण्याच्या तयारीत नाही, आता जनता काँग्रेसला पर्याय म्हणूनही पाहात नाहीत, अशी दुर्देवी परिस्थिती या पक्षाची झाली आहे. खरे तर काँग्रेसपुढे अनेक समस्या आहेत, त्या समस्यांची उत्तरेही पक्षापुढे आहेत; पण ती उत्तरे प्रत्यक्षात आणण्याच्या मनःस्थितीत काँग्रेस नाही. अनेक वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला का अमलात आणला जात नाही? हे एक कोडेच आहे. निवडणुका कोणत्याही असोत, त्यांचे नेतृत्व राहुल गांधी हेच करतात; आणि राहुल यांना  काँग्रेसच्या कुठल्या विजयाचे श्रेय मिळेल न मिळेल, पण पराभवाचे खापर मात्र शंभर टक्के त्यांच्याच डोक्यावर फोडले जाते. अशाने त्यांच्याविषयी देशात नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे विरोधकही या बाबीचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. खरे तर बिहारमध्ये मुख्य लढत तशी तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात होती. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष बिहारमध्ये कुणाच्या तरी सोबतीनेच लढत होते. पण ज्या पद्धतीचे निकाल आले, त्यामुळे या दोन्ही पक्षांवर झालेल्या परिणामातला फरक मात्र टोकाचा आहे. भाजपने या निवडणुकीत राजकीय रणनीती वापरून उचल खाल्ली तर काँग्रेसला अशी रणनीतीच आखता आली नाही. उलट लोकांनी काँग्रेसला नाकारल्याने त्याचा फटका तेजस्वींच्या राजदला बसला. या निवडणुकीचे पडघम एकीकडे वाजत असताना, दुसरीकडे, हाथरस प्रकरणात राहुल गांधी आक्रमकपणे उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारला भिडले, त्यामुळे ते आता लवकरच सक्रीय होतील अशी चर्चा सुरु असतानाच, आता बिहारमध्ये माशी शिंकली. राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदी बसवण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत चालली आहे असे काँग्रेसजनांना वाटत असतानाच, बिहारमुळे आता त्याला मोठा ब्रेक लागल्याचे दिसत आहे. परिपक्व राजकीय नेतृत्व म्हणून राहुल गांधी यांना पुढे येता येत नसेल तर ते त्यांचे राजकीय अपयश मानावे लागेल. बिहारमध्ये काँग्रेसने 2015च्या विधानसभा निवडणुकीत 41 जागा लढवल्या त्यापैकी 27 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस-संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल हे तिघेही एकत्रित होते. यावेळी काँग्रेसच्या वाट्याला 70 जागा आल्या पण त्यांनी जिंकल्या अवघ्या 19. डावे पक्षही काँग्रेस-राजदसोबतच्या महाआघाडीत सहभागी होते. त्यांच्या वाट्याला जागा आल्या 29, त्यापैकी 16 त्यांनी जिंकल्या. त्यामुळे काँग्रेसला इतक्या जागा द्यायलाच नको होत्या, अशी चर्चा सुरू झाली. पण मुळात ज्या राष्ट्रीय जनता दलाने 2015 मध्ये 100 जागा लढून 80 जागा जिंकल्या होत्या, त्यांनाही यावेळी 140 जागा लढून 75 जागाच जिंकता आल्या. राजदच्या नेत्यांना काँग्रेसकडून मुळात अपेक्षा होती, ती 20 जागांची; त्यांचा स्वत:चा पक्ष 90 च्या आसपास जाईल, असा त्यांचा कयास होता. काँग्रेसकडून इतकी कमी अपेक्षा का होती? कारण बिहारमधे 1995 पासून काँग्रेसची प्रचंड घसरण झाली आहे. 2005च्या निवडणुकीत काँग्रेसने केवळ नऊ जागा जिंकल्या होत्या, तर 2009मध्ये अवघ्या चार. या दोन्ही निवडणुकांवेळी काँग्रेसची केंद्रात सत्ता होती, हेही विशेष. त्यामुळे जागा आणि स्ट्राईक रेट या दोन्हीचा विचार केला तरी काँग्रेसची बिहारमधील 2020 च्या निवडणुकीतली कामगिरी ही 1995 पासूनची नंबर दोनची होती. बिहारमध्ये सवर्णांची मते दोनच पक्षात विभागली आहेत; भाजप आणि काँग्रेस. राजदला चांगली साथ देण्यासाठी काँग्रेसने बिहारमध्ये सवर्णांचा पक्ष ही भूमिका निभवणे अपेक्षित होते. पण या मतांचा ओढा भाजपकडेच अधिक राहिला. याचा अर्थ भाजपने काँग्रेसचा परंपरागत मतदार पळवला आहे. काँग्रेस नेतृत्व म्हणून कमी तर पडतेच; पण राजकीय रणनीती आखण्यातही हा बलाढ्य पक्ष कमी पडू लागला आहे. म्हणूनच आम्ही सांगत असतो, की काँग्रेसकडे त्यांच्या समस्यांची उत्तर आहेत, पण ती प्रत्यक्षात आणत नसल्याने काँग्रेसचा आलेख वेगाने खाली येत आहे. गुजरातमध्येदेखील  पोटनिवडणुकांत काँग्रेसने सर्व 7 जागा गमावल्या, त्यातील तिघांची अनामत रक्कम जप्त झाली. उत्तरप्रदेशात 7 जागांवर 2 टक्क्यांपेक्षा कमी मते काँग्रेस उमेदवारांना मिळाली. मध्यप्रदेशात 28 जागांवरही काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली, हे सर्व पराभव साधी घटना आहे का? इतका दारुण पराभव होत असताना, काँग्रेस त्यांच्या नेतृत्वात बदल करायला तयार नाही, की आपली ध्येयधोरणे बदलायलाही तयार नाही. भारतीय निवडणुका वेगाने बदलत असून, हे बदल नेमके काय आहेत? याचा विचारही काँग्रेस करताना दिसत नाही. सोशल मीडिया व संपर्क क्रांतीमुळे देशातील निवडणुका या अध्यक्षीय निवडणुकांसारख्या लढल्या जात आहेत. काँग्रेसने त्यांच्यातील कमतरता समजून घेतल्या नाहीत तर निवडणुकांत त्याचे चित्र स्पष्ट दिसणार नाही. केवळ उमेदवार जाहीर करून निवडणुका लढवून बदल होणार नाहीत तर काँग्रेसची विचारधारा, तिची विश्‍वसनीयता, पक्षात असलेली संवादाची जागा बदलल्यास जनता पुन्हा एकदा काँग्रेसला स्वीकारू शकेल. कोणत्याही निवडणुकांत काँग्रेसचाच पराभव होतो असे नाही. उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यात ज्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला; तेही चांगलेच पोळून निघालेत. आधी अखिलेश यादव आणि आता तेजस्वी यादव. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत युती-आघाडी करताना अनेक पक्ष सावधानता बाळगतील. त्याची झलक बंगालमध्ये दिसायला सुरुवातही झाली आहे. माकप नेते सीताराम येचुरी यांनी बिहार निकालानंतरच काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला. बिहारपासून काँग्रेसने बंगालसाठी धडा घेण्याची आवश्यकता आहे. ज्या जागा ते जिंकू शकतात त्याच जागांवर त्यांनी लढलेपाहिजे, असेवक्तव्य येचुरी यांनी केले होते. खरे तर बंगालमध्ये विरोधी पक्षनेता आहे काँग्रेसचा. काँग्रेसने 2016 च्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांपेक्षाही कमी जागा लढून अधिक जागा जिंकल्या. काँग्रेस 44 आणि डावे 33 जागा जिंकले होते. डाव्यांचे प्राबल्य बंगालमध्ये अधिक असल्याने याहीवेळी तेच अधिक जागा लढतील. पण बिहारच्या निमित्ताने त्यांनीही काँग्रेसला जागावाटपाच्या बाबतीत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एकीकडे तृणमूलला टक्कर देण्यासाठी भाजप बंगालमध्ये पाय रोवताना दिसत असताना, दुसरीकडे काँग्रेससाठीही अनुकूल वातावरण तेथे दिसत नाही. बिहारमध्ये लढाई ही तेजस्वी आणि नीतीश कुमार अशीच होती. तेजस्वी यांनी तुफानी प्रचार केला होता, मात्र तरीही त्यांना यश मिळाले नाही. जर बिहारमध्ये महागठबंधन जिंकले असते तर विजयाचे श्रेय हे तेजस्वी यांनाच मिळाले असते; पण पराभवानंतर मात्र सगळे खापर राहुल गांधी यांच्यावर फोडले जात आहे. पक्षातून कपिल सिब्बल यांनी नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केलेच आहे; पण मित्रपक्षातून राजदचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींच्या ऐन प्रचाराच्या धामधुमीतल्या पिकनिकवर बोट ठेवले. इतकेच काय ओबामांच्या आत्मचरित्रातल्या टिपण्णीचाही योग आत्ताच जुळून यायचा होता का? अजूनही फारशी वेळ गेलेली नाही. काँग्रेसने नेतृत्व, धोरणे, आणि जनसंपर्क यांच्यात तातडीने बदल करायला हवा. अन्यथा, पराभव हीच काँग्रेसची ओळख बनून जाईल!

---------------------