महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड; केबिनही तोडली कोपरगावः टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण ...
महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड; केबिनही तोडली
कोपरगावः टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर झटका मोर्चा काढला. कोपरगाव येथील मनसेच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. मनसे कार्यकर्त्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच अभियंत्याच्या केबिनचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. केबिनच्या काचा फोडल्या. मनसे आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
‘वीज बिल भरु नका’, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. राज ठाकरे यांचे निवेदन मनसे नेत्यांमार्फत जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. राज जोपर्यंत वीज बिल भरा म्हणून सांगत नाहीत, तोपर्यंत एकाही वीज ग्राहकाने वीज बिल भरु नये. जर का कोणी तुमचे वीजजोड तोडण्यासाठी आले, तर फक्त जवळपासच्या मनसे कार्यकर्त्याला फोन करा आणि मग परिणाम पाहा, असे आवाहन मनसेने नागरिकांना दिले आहे.
वीज बिलांच्या विरोधात राज्यभरात निघालेल्या मनसेच्या मोर्चेकर्यांची धरपकड सुरू आहे. मनसेने गुरूवारी राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले होते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले; मात्र अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही औरंगाबादमध्ये मनसेने आंदोलन केले. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार होता; मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी कार्यकर्त्यांसह औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकांमध्ये वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन सुरू केले.