मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी निर्माता करण जोहरवर शीर्षक चोरीचा आरोप लावला होता. तसेच, वेब सीरीजचे शीर्षक ...
मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी निर्माता करण जोहरवर शीर्षक चोरीचा आरोप लावला होता. तसेच, वेब सीरीजचे शीर्षक बदलण्याची मागणी देखील केली होती. यानंतर आता करण जोहरने मधुर भांडारकरची जाहीर माफी मागितली आहे. आपण पाठवलेल्या कायदेशीर नोटीसलादेखील करण जोहर उत्तर देत नसल्याचे, मधुर भांडारकर यांनी म्हटले होते. त्यांनंतर अखेर करण जोहरने नमते घेतले आहे. मात्र, शीर्षक बदलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
शीर्षक चोरी प्रकरणी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी काल (26 नोव्हेंबर) पुन्हा एकदा ट्विट केले होते. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘19 नोव्हेंबरपासून धर्मा मुव्हीजला अनेक नोटीसा पाठविल्या गेल्या आहेत. त्यापैकी दोन आयएमपीए, एक आयएफटीडीए आणि दोन नोटीस एफडब्ल्यूईसीने पाठवल्या आहेत. या सर्व नोटिसा ‘बॉलिवूड वाईफ्स’ या चित्रपटाचे शीर्षक हस्तगत केल्याबद्दल पाठविल्या गेल्या आहेत. परंतु, यापैकी कोणत्याही नोटिसांवर धर्मा प्रोडक्शनने अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिले नाही.’
करण जोहरने ट्विटर एका माफिनाम्याचे पत्र पोस्ट करत मधुर भांडारकर यांची माफी मागितली आहे. या माफीनाम्यात करणने या वेब शोचे नाव ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ ठेवण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. या माफीनाम्यात करण लिहतो, ‘प्रिय मधुर, आपण दोघेही बर्याच वर्षांपासून या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत आणि आपलं नातं खूप जुनं आहे. मी त्या दिवसांत तुझ्या कामाचा चाहता होतो आणि नेहमीच तुझ्या चांगल्यासाठी प्रार्थना करतो.
करण जोहरने पुढे लिहिले की, ‘मला माहित आहे की, तू रागावला आहेस. तू गेल्या काही आठवड्यांत ज्या त्रासातून गेलास त्याबद्दल मी दिलगीर आहे. परंतु, मी सांगू इच्छितो की हे नवीन आणि वेगळे शीर्षक मी ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’या नॉन फिक्शन शो फ्रेंचाइजीवर आधारित फॉरमॅट लक्षात घेऊन ठेवले आहे. आमचे हे शीर्षक पूर्णपणे वेगळे आहे. म्हणून मला वाटले की, यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.’
‘आपण आता हे वाद मागे सोडून, पुढे जाऊया. प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येऊया. तुला तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा आणि मला नेहमी तुझ्या नव्या कलाकृतींची प्रतीक्षा असेल’, असे म्हणत करण जोहरने या वादावर पडदा टाकण्याची मागणी केली आहे.