Breaking News

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक रोमांचक टप्प्यावर!

- निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचे आरोप


वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक टप्प्यावर पोहोचली असून, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यातील सामना अटी-तटीचा झाला आहे. दरम्यान, मतमोजणी सुरु असताना ट्रम्प आणि बायडन यांनी पत्रकार परिषदा घेत, एकमेकांवर आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला. आरोपांमुळे पेंसिल्वेनियामध्ये मतगणना थांबवण्यात आली असून, तिथे गुरुवारी मतगणना होणार आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी आता वाट पाहावी लागणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मतगणनेबाबत घोटाळ्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला तर बायडन यांनीदेखील न्यायालयात जाण्याबाबत भाष्य केले. पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला. तसेच पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगून, आपण जिंकणारच होतो, म्हणजेआपण जिंकलोच आहोत, असे ट्रम्प व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. पेंसिल्वेनियामध्ये रात्रभर मतगणना का होत आहे? असा सवाल त्यांनी केला. दुसरीकडे, इलेक्टोरल मतगणनेत बायडन हे आघाडीवर होते. त्यांनी देशाला संबोधित करत जिंकण्याबाबतचा दावा केला. बायडन म्हणाले की, आपल्याला जिंकण्याचा पूर्ण विश्‍वास आहे. आपण वाट पाहू. आपण  ऐरिजोना आणि मैनिसोटा सह अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. निवडणूक तोवर संपणार नाही जोवर एक एक बॅलेटची मोजणी होणार नाही, असेही ते म्हणाले. बायडन यांना आतापर्यंत 236 आणि डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत 213 इलेक्टोरल मते मिळाली आहेत.


विक्रमी मतदान

अमेरिकेत यंदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवे राज्य आहे, जिथे 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाले. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपले मतदान केले होते. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसर्‍यांदा जिंकणार की डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.