मुंबईः बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती; मात्र मुंबई उच्...
मुंबईः बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती; मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेची कारवाई अवैध असल्याचा ठपका ठेवला. या कारवाईत कंगनाचे किती नुकसान झाले, याचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली. दरम्यान, न्यायालयाने कंगनाचीही कानउघाडणी केली.
कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज न्यायालयाने या याचिकेवर आपला निकाल दिला. कंगना राणावतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. महापालिकेने कंगनाला दिलेली नोटीस अवैध आहे. त्यामुळे त्याविषयी महापालिकेला भरपाई द्यावी लागेल. कंगनाच्या विनंतीचा विचार करण्यासाठी नुकसानीचे मूल्यमापन नंतर केले जाईल आणि त्याविषयीनंतर निर्णय दिला जाईल, असा निर्णय न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दिला आहे. कंगनाच्या कार्यालयाविरोधात केलेली कारवाई मुद्दाम ठरवून केली आहे, चुकीच्या हेतूने केलेली आहे, असं मतही न्यायाधीशांनी नोंदवले आहे.
मुंबई महापालिकेची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे, असे मत न्यायमूर्तींनी मांडले. त्यामुळे कंगनाला भरपाई देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. मुंबई पाकव्याप्त भाग आहे आणि मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केल्यामुळे शिवसेना व कंगना असा वाद पेटला होता. या वादाला नऊ सप्टेंबर रोजी नवीन वळण मिळाले. मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांनी पाली हिल वांद्रे परिसरातील कार्यालयावर हातोडा चालवला. कंगनाने आपल्या कार्यालयाच्या समोर अनधिकृतरित्या स्लॅबही उभारला आणि दुसर्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी उभारली. तसेच कंगनाने आपल्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय उभारले. देवघर आणि लिव्हिंग रुममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन तयार केले असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला होता. त्याचबरोबर, तळ मजल्यावर अनधिकृतरित्या किचन, ग्राऊंड फ्लोअरवर पायर्यांवर बेकायदेशीररित्या शौचालय उभारण्यात आल्याचा दावाही महापालिकेने केला होता.
ठाकरे सरकारचे तोंड काळे
मुंबई महापालिकेची कारवाई बेकायदा असून कंगनाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचे तोंड काळे झाले, अशी विखारी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.