Breaking News

दहावी, बारावीच्या परीक्षा मेपूर्वी अशक्य!

- शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती
- 23 तारखेपासून नववी, बारावीचे वर्ग सुरु होणार


मुंबई/ प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असेही त्या म्हणाल्या.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत. म्हणून मे महिन्यात या परीक्षा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सप्टेंबर म्हटले की निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्याचे नुकसान होईल. त्या दृष्टीने आम्ही मंत्रिमंडळात शाळा सुरु करण्याबाबत आणि दहावी बारावी परीक्षेबाबत प्रस्ताव ठेवलेला आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत. तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीही आमचा प्रयत्न आहे. आम्ही दहावी बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला आहे आणि त्याची माहिती एससीईआरटी या वेबसाईटवर आहे. राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचे प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. दहावी आणि बारावी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थी आणि पालकांचे दडपण कमी कसे करता येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

---------------------