मुंबई ः राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचा...
मुंबई ः राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान,आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्याः ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे चार जानेवारीपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी साडेतीन दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या एक डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी सात डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली