पारनेर तालुक्यातील काटाळवेढा येथील घटना पारनेर/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यावर बंदी असतांन...

पारनेर तालुक्यातील काटाळवेढा येथील घटना
पारनेर/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यावर बंदी असतांना देखील, पारनेर तालुक्यातील काटाळवेढा येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी कारवाई करत, तब्बल 14 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील लोकांचाही समावेश आहे. पोलिस नाईक श्यामसुंदर विश्वनाथ गुजर यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून बैलाच्या शर्ती लावून जनावरांना क्रूरतेने वागणूक दिली. यामुळे सुभाष रामदास गाजरे, बाबाजी रामदास गाजरे, युवराज रामदास गाजरे, विलास पांडूरंग भाईक, संभाजी सुखदेव भाईक, सोमनाथ पांडूरंग भाईक, धर्मनाथ रघुनाथ भाईक, बाळू बबन गुंड, खंडू कचरू भाईक, विजू दादाभाउ गाजरे, प्रकाश किसन घटाटे (सर्व रा काताळवेढा ता. पारनेर), ज्ञानदेव धनाजी साबळे, विशाल धनाजी साबळे (दोघेही रा नळावणे ता जुन्नर), सुरेश भीमा काकडे (पळसपूर ता पारनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बैलगाडा शर्यतीला बंदी असली तरी काही शोकीन आदेशाची पायमल्ली करत शर्यतींचे आयोजन करतात. पुणे जिल्हातील खेड तालुक्यातही काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यानंतर आता पारनेर तालुक्यातील काताळवेढे येथे आयोजन करण्यात आले होते. या आरोपींनी कातळवेढा गावच्या शिवारापासून एक किलोमीटर अंतरावर माळरानाचे चढावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. याप्रकरणी तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी शर्यत सुरू असल्याने त्या थांबवण्यात आल्या होत्या. तसेच 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई पोलीस निरीक्षक घनश्याम बलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे त्यामुळे गावागावात घुमणारे बैलगाडीच्या शर्यती चा आवाज बंद झाले मात्र तरीही अनेक ठिकाणी बंदी असूनही बैलगाडा शर्यत भरवल्या जातात मात्र याबाबत तक्रारी प्राप्त होतात आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया पोलिसांनी अनेक ठिकाणी केल्या आहे तालुक्यात अशा प्रकारच्या शर्यती भरण्याचे प्रकार होत असतात त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्वरित दखल घेत कारवाई करत आहे बैलगाडी शर्यती होण्याबाबत ग्रामीण भागामध्ये उत्सुकता असली तरी न्यायालयाने बंदी घातल्यामुळे या शर्यतींना आवर घालावा लागला आहे बैलगाडा शर्यत शौकिनां चा हिरमोड होत असला तरी काही शोकिन न्यायालयाचे नियम डावलून अशाप्रकारे शर्यतींचे आयोजन करतात.
----------------------------
बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणे गुन्हा आहे. तरी देखील या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे आढळून आले. त्यामुळे या आरोपींविरोधात कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील कातळवेढा येथील 14 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.यापुढेही अशा प्रकारच्या शर्यती भरणार्या विरोधात कारवाई करण्यात येईल.
घनश्याम बळप, पोलीस निरीक्षक पारनेर