सांगली प्रतिनिधी : सांगली मार्केट यार्डमध्ये नरेश नानवाणी या व्यापार्याच्या गोदामावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून वीस लाखांचा गुटख...
सांगली प्रतिनिधी : सांगली मार्केट यार्डमध्ये नरेश नानवाणी या व्यापार्याच्या गोदामावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून वीस लाखांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी व्यापार्याला अटक करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक आदित्य मीरखेलकर यांनी याबाबतची माहिती दिली. आठवड्यापूर्वी विजयनगर (म्हैसाळ) येथे मिरज ग्रामीण पोलिसांनी गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली होती. त्या प्रकरणातील फरारी संशयिताला अटक केल्यानंतर आज जप्त केलेल्या साठ्याबाबतची माहिती मिळाली होती.
लाखो रुपयांचा गुटखा सांगली मार्केट यार्डमध्ये नानवाणी यांच्या दुकानात लपवून ठेवला असल्याबाबत मीरखेलकर यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकासह मार्केट यार्डात छापा टाकला. छाप्यात सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला.
जुन्या प्रकरणातील गुटखा लपवून ठेवल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सांगलीत छापा टाकून 20 लाखांचा गुटखा जप्त करुन मोठी कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात कारवाई सुरू होती. दरम्यान, सांगली पोलिसांनी गुटखा विरोधात मोहिम सुरू केली आहे. कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून होणार्या गुटखा तस्करीचा मीरखेलकर यांनी पर्दाफाश केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी बेडग (ता. मिरज) येथे लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता.
.................