जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत ...
जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 25 लाखांची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 21 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा, अशी घोषणा पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरस कमी व्हावी आणि गावाचा विकास व्हावा म्हणून आपण अशी घोषणा करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात जेणेकरुन शासनाचा खर्च वाचेल तसंच निवडणूक आणि प्रचार रणधुमाळीपासून गावकरी दूर राहतील आणि गाव विकासाच्या मार्गावर जातील या प्रयत्नातून आपण ही संकल्पणा राबवत असल्याचं चिमणराव पाटील म्हणाले.
तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडेल त्या गावाला 21 लाखांचा निधी देण्यात येईल, असं पाटील यांनी सांगितलं. पहिल्यांदा अशा प्रकारची घोषणा पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानंतर आज आमदार चिमणराव पाटील यांनी अशा प्रकारची घोषणा केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि 25 लाख रुपये मिळवा- निलेश लंके
राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणा निलेश लंके यांनी केली आहे. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.
आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.