अहमदनगर / प्रतिनिधीः राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ...
अहमदनगर / प्रतिनिधीः राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.
बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली आहे. लंके हे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि शासनाचा खर्च वाचावा म्हणून लंके यांनी ही शक्कल लढवली आहे. तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडतील, त्या गावाला 25 लाखांचा निधी देण्यात येईल, असे लंके यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे; मात्र त्यांच्या या निर्णयाची ग्रामस्थ अंमलबजावणी करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या 15 जानेवारी रोजी पार पडणार असून सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. लंके यांच्या पारनेर मतदार संघातील 110 ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश असून, ज्या गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवतील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील, त्या गावांना स्थानिक विकास निधीतून 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली आहे.
एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीने राबविणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्याने मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या. आता निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.