परभणीः परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने अवैध धंदे चालवणार्यांच्या विरोधात धाडसी मोहीम रा...
परभणीः परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने अवैध धंदे चालवणार्यांच्या विरोधात धाडसी मोहीम राबवल्यानंतर आता अवैध धंद्यांच्या पडद्यामागील ’व्हाईट कॉलर’ सुत्रधारांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी सरसावली असल्याचे दिसून येत आहे.
विशेष पथकाने काल रविवारी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील मोंढा भागात छापा टाकून तब्बल 6 लाख 12 हजार 500 रुपयांचा शासकीय स्वस्त जप्त केले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पुरवठा विभागात कार्यरत भ्रष्ट झारीतील शुक्राचारांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होतांना दिसून येत आहे. जिल्ह्यातील गंगाखेड मध्ये मोंढा भागात मोठ्या प्रमाणात राशनचा तांदूळ आला असून तो काळ्याबाजारात विक्रीसाठी दिला जाणार असल्याची माहिती विशेष पथकाला गुप्त माहितीदाराकडून मिळाली होती. त्यावरून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक दडस,सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले,पथकातील सहकारी पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,अजहर पटेल, विष्णु भिसे, दिपक मुदिराज आदींच्या पथकाने काल रविवारी मिळालेली माहिती खात्रीदायक असल्याची खातरजमा केली. त्यानंतर मोंढा परिसरात बेकायदेशीररित्या ठेवलेला राशनचा तांदूळ पथकाने छापा टाकून जप्त केला. तेथील पोत्यांची तपासणी केली त्यावेळी त्यात राशनचा तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले. सर्व पोत्यांची पाहणी करित मोजमाप केली त्यावेळी तब्बल तो 35 टन शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील तांदूळ साठा असल्याचे निदर्शनास आले. पथकाने तेथील एक वाहन जप्त केले. ज्यात शासकीय तांदळाची वाहतूक करण्यासाठी वापरले जात होते. यावेळी पथकाने तेथील दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून 6 लाख 12 हजार 500 रुपयांचा 35 टन शासकीय स्वस्त धान्यातील तांदूळ व 3 लाख 50 हजार रुपयांचे वाहन असा एकूण 9 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे तसेच दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.