कोयनानगर / वार्ताहर : पाटण तालुक्याचा इतिहास व भूगोल बदलणार्या कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला शुक्रवारी 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 54 वर्षां...
कोयनानगर / वार्ताहर : पाटण तालुक्याचा इतिहास व भूगोल बदलणार्या कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला शुक्रवारी 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 54 वर्षांत कोयना परिसरात एक लाख 21 हजार भूकंपाचे धक्के बसले. त्याची नोंद ठेवणार्या कोयना प्रकल्पाच्या भूकंप वेधशाळेला अपुरा कर्मचारी वर्ग व संपत असलेले फोटोग्राफीक पेपर यामुळे बंदीचा धक्का बसला आहे. कोयना प्रकल्पाच्या पाचपैकी दोन वेधशाळा बंद पडल्या असून, कोयनेची मुख्य भूकंप वेधशाळा मार्चनंतर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. भूकंप वेधशाळा बंद पडण्याचा फार मोठा धक्का कोयना प्रकल्पाला बसत असून, शासनाचे उदासीन धोरण याला कारणीभूत ठरत आहे. मुख्य भूकंपमापन केंद्रात काम करणारे वैज्ञानिक सहायक या पदावरील डी. एम. चौधरी हे मार्चनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या पदाचे दुसरा कोणताही कर्मचारी कार्यरत नसल्यामुळे मार्चनंतर कोयनेची भूकंप वेधशाळा अपोआप बंद पडणार आहे.
कोयना धरणाच्या उभारणीवेळी धरणाच्या पोटात कोयनानगर, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी येथे कोयना प्रकल्पाने भूकंप वेधशाळा उभारल्या होत्या. सेस्मौलौजिकल अब्जव्हेटरी या नावाने त्या ओळखल्या जातात. या भूकंपाच्या वेधशाळेत यामुळे 11 डिसेंबर 1967 च्या त्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली होती. या भूकंप वेधशाळांत भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता व भूकंपाचा केंद्रबिंदूच्या अंतराची माहिती काही क्षणात मिळते. कोयना प्रकल्पाने पाच ठिकाणी उभारलेल्या भूकंपाच्या वेधशाळा एकमेकांना पूरक आहेत. प्रत्येक भूकंपाची वेधशाळेतून घेतली जाणारी माहिती कोयनानगर येथील भूकंपाची मुख्य वेधशाळा संकलित करून भूकंपाचा रिश्टर स्केल व केंद्रबिंदूचे अंतर जाहीर करतात. भूकंपाचे योग्य अनुमान काढण्यासाठी फोटोग्राफीक पेपरचा वापर केला जातो. कोयना प्रकल्पाच्या भूकंपाच्या किरनॉस या वेधशाळेत दररोज न जाणवणारे भूकंपाचे चार ते पाच धक्के नोंद होतात.
कोयना प्रकल्पाने उभारलेल्या पाच भूकंपमापन वेधशाळांपैकी महाबळेश्वर व रत्नागिरी वेधशाळा गेल्या वर्षी फोटोग्राफीक पेपर व पुरेशा कर्मचारी संख्येअभावी बंद आहेत. याचा फटका कोयनानगर येथील भूकंपाच्या मुख्य वेधशाळेला बसत आहे. त्यामुळे भूकंपमापन करण्यास यामुळे विलंब होत आहे. कोयनानगर येथील मुख्य भूकंपमापन केंद्रात मार्चनंतर वैज्ञानिक सहायक या पदावरील डी. एम. चौधरी हे एकमेव कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. या पदाचे दुसरा कोणताही कर्मचारी या ठिकाणी कार्यरत नसल्यामुळे मार्चनंतर कोयनेची भूकंप वेधशाळा अपोआप बंद पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोयनेची मुख्य भूकंप वेधशाळा बंद पडल्यास त्याचा मोठा पटका बसणार आहे.