सातारा / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागावच्या (ता. कराड) हद्दीत आयडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) दुचाकीवरून आ...
सातारा / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागावच्या (ता. कराड) हद्दीत आयडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रस्त्यात धारदार चाकूचा धाक दाखवून 55 हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. शनिवारी (ता. 19) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व पाकिटातील तीन हजारांची रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लुटला.
प्रदीप बबनराव पाटील (वय 37, मॅनेजर, आयडीएफसी शाखा, शनिवार पेठ, सातारा, मूळ रा. तांबवे, ता. वाळवा, सध्या रा. देवी चौक, शनिवार पेठ, सातारा) यांनी तळबीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी सायंकाळी प्रदीप पाटील हे सातार्याहून दुचाकीने महामार्गावरून तांबवेला (ता. वाळवा) निघाले होते. प्रवासादरम्यान वहागाव येथे दोन अनोळखी चोरट्यांनी पाठीमागून येत तुझ्या गाडीने डॅश दिला आहे असे म्हणून पाटील यांच्या गाडीला गाडी आडवी मारली. गाडी थांबवून गाडीवरून खाली ओढून ढकलत सेवा रस्त्यावर नेत तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीची चेन व हातातील 17 हजार रुपये किमतीची अंगठी चाकूचा धाक दाखवून हिसकावली. तसेच खिशातील पाकिटातील तीन हजार रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीची कागदपत्रे, एटीएम कार्ड व कागदपत्र हिसकावून घेत चोरट्यांनी तेथून पोबारा केला. पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जयश्री पाटील अधिक तपास करत आहेत.