इचलकरंजी / प्रतिनिधी : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे महिन्याभरापूर्वी झालेली घरफोडी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत च...
इचलकरंजी / प्रतिनिधी : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे महिन्याभरापूर्वी झालेली घरफोडी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटा लोकेश रावसाहेब सुतार (वय 26, रा. खराव रोड, पाटील मळा, लिंगनूर, ता. मिरज) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकी, मोबाईलसह 93 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी ही कामगिरी केली आहे.
जयसिंगपूर-कोल्हापूर मार्गावरील निमशिरगांव गावच्या हद्दीत सापळा रचून इचलकरंजी गुन्हे शाखेच्या पथकांने सुतार याला पकडले. त्याच्या चौकशीदरम्यान त्यांने संभाजीपूर येथे बंद घर फोडून दागिने लांबवल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, गंठण, चेन, अंगठ्या असे 93 ग्रॅम वजनाचे दागिने तसेच गुन्ह्यातील दुचाकी, मोबाईल जप्त केला. सुतार हा सातत्याने पथकाला गुंगारा देत होता. उघडकीस आलेल्या घरफोडीची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली होती. त्यामुळे चोरटा सुतार याच्यासह जप्त मुद्देमाल शिरोळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सपोनि विकास जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकांने ही कारवाई केली. यामध्ये संभाजी भोसले, राजीव शिंदे, महेश खोत, रणजित पाटील, संजय इंगवले, प्रशांत कांबळे, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, शहनाज कनवाडे, राजू कांबळे, यशवंत कुंभार यांच्यासह सायबर विभागाचे सचिन बेंडखळे, सुरेश राठोड सहभागी झाले होते.