कोल्हापूर / प्रतिनिधी : 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेले चांदोली जलाशय व अभयारण्य 31 डिसेंबर व नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर 30 डि...
कोल्हापूर / प्रतिनिधी :
1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेले चांदोली जलाशय व अभयारण्य 31 डिसेंबर व नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2021 पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे चांदोली वन्यजीव विभाग व धरण प्रशासनामार्फत पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
पावसाळ्यानंतर 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेले चांदोली धरण व अभयारण्य पाहण्यासाठी चांदोलीकडे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. डिसेंबरच्या प्रारंभी 20 दिवस अभयारण्य पर्यटकांसाठी मोफत खुले करण्यात आले होते. यावेळी कोरोनाच्या महामारीने आठ महिने अडकून पडलेल्या हजारो पर्यटकांनी कुटुंबासह भेट देऊन तेथील प्राणी, पक्षी, थंडगार हवा, निसर्ग सौंदर्य, जलाशय याचा मनमुराद आनंद लुटला होता.
उत्साही पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राष्ट्रीय उद्यानमधील वन्यजीव तसेच धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच 31 डिसेंबर व नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी 2021 रोजी असे तीन दिवस चांदोली पर्यटन बंद राहणार आहे. शनिवार, दि. 2 पासून अभयारण्य व धरण पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे, असे आवाहन चांदोली वन्यजीव विभाग तसेच धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.