सर्व्हर ठप्प झाल्याने यंत्रणेचा बोजवारा; ऑफलाईन अर्ज भरताना कोरोना नियम पायदळी पुणे / प्रतिनिधी: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या...
सर्व्हर ठप्प झाल्याने यंत्रणेचा बोजवारा; ऑफलाईन अर्ज भरताना कोरोना नियम पायदळी
पुणे / प्रतिनिधी: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही गोंधळात गोंधळ सुरू होता. तब्बल दोन तास महा ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा एकच बोजवारा उडाला. त्यामुळे इच्छुकांनी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी धाव घेतल्याने तहसील कार्यालयाबाहेर एकच गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला.
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. गेल्या चार पाच दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरण्याचा गोंधळ सुरू असल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाईन फॉर्म भरण्याचीही मुभा दिली आहे. तसेच संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ वाढवून दिली होती. ऑफलाईन अर्ज बाद होऊ नये, म्हणून अनेकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यावर भर दिला होता; पण दुपारी महा ऑनलाईन सर्व्हर दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची गर्दी नंतर ऑफलाईनकडे वळाल्याने अर्ज स्वीकारणार्या यंत्रणांवर ताण आला होता. त्यामुळे अनेक तहसीलमधील काम ठप्प झाले होतं. अचानक झालेल्या गर्दीमुळे तहसील कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. सर्वच तहसील कार्यालयाबाहेर हे चित्र होते. पुण्यातील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सर्व्हर डाऊन झाल्याने खोळंबली. त्यामुळे इच्छुकांच्या संतापाचा पारा चढला होता. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे इच्छुकांची पळापळ झाली. ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्याने उमेदवारांनी लगोलग ऑफलाईन अर्ज पूर्ण भरून तो भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटेपासूनच केंद्रावर इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या.16 पानी अर्ज भरताना नाकीनऊ आल्याने या उमेदवारांनी वेळ कमी पडू नये, म्हणून वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 618 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर एकच गर्दी झाली होती. कोरोनाची भीती न बाळगता अनेक उमेदवारांनी गर्दी केल्याने तहसील कार्यालयात पाय ठेवण्यासाठी जागाही उरली नव्हती. मालेगावमध्ये 99 ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याकरिता इच्छुकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोल्हापुरात 433 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत असून आतापर्यंत नऊ हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ही संख्या दहा हजारावर जाणार असल्याचे सांगण्यात येते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वेळेत अर्ज भरता यावा म्हणून इच्छुकांनी कृषी महाविद्यालय अर्ज स्वीकृती केंद्रावर मोठी गर्दी केली होती. कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याकरिता तहसील कार्यालयाबाहेर आज एकच गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे पोलिसांना कार्यकर्त्यांना तहसीलबाहेर काढावे लागले.