सरकार टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही नसीम खान यांचा इशारा; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अन्य पक्षांत प्रवेश मुंबई / प्रतिनिधी: शिवसे...
सरकार टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही
नसीम खान यांचा इशारा; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अन्य पक्षांत प्रवेश
मुंबई / प्रतिनिधी: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्या पक्षातील लोकांना फोडले जाते. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालले पाहिजे. अन्यथा, सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नसेल, असा इशारा काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याविषयी खान यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. आमच्या पक्षातील लोकांना इतर पक्षात घेतले जाते. यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने असे वागू नये. काँग्रेसच्या लोकांना घ्यायचेच असेल, तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांशी चर्चा केली पाहिजे. सरकार टिकवण्याची जबाबदारी ही एकट्या काँग्रेसची नाही, असे त्यांनी सांगितले.
अमीन पटेल, झिशान सिद्दीकी या आमदारांना सरकारकडून निधी दिला जात नाही. हे मुद्दाम केले जात आहे का? मुंबईत काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसने 227 महापालिका वॉर्डांमध्ये निवडणूक लढवावी आणि काँग्रेसचा महापौर बसेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही खान यांनी म्हटले.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षाविषयी बोलण्याचा अधिकार शिवसेनेला कोणी दिला? जो पक्ष यूपीएचा भाग नाही, त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. सोनिया गांधी याच यूपीएच्या अध्यक्ष राहतील. तसेच राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखवणार्याचे बोट तोडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.