पाशा पटेल यांचे मत; विधेयकावरील चर्चेला अनुपस्थित का राहिले? अहमदनगर / प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आत्मा शेती आ...
पाशा पटेल यांचे मत; विधेयकावरील चर्चेला अनुपस्थित का राहिले?
अहमदनगर / प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, असे म्हणतात. ते राज्यसभेचे सदस्य आहेत; मात्र शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्यावरच चर्चा राज्यसभेत सुरू असताना ते गैरहजर का राहिले असतील, असा खोचक सवाल कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. पवार हे प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्यांनी असे म्हटले, की कृषी विधेयक मांडण्याच्या सिस्टिमला विरोध आहे, विधेयकाला नाही. हे म्हणजे कही पे निगाहे, कही पे निशाना असेच आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दिल्लीत सुरू असणार्या शेतकरी आंदोलनावरून विरोधकांचा चांगला समाचार घेतला. ’कृषी विधेयकावरून पंजाब, हरियाणा सोडले, तर कुठेच भारतात शेतकर्यांचा उद्रेक झाला नाही,’ असे सांगतानाच पटेल म्हणाले, की जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात, तेव्हा आठ दिवस रस्ते बंद असतात; पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर नाहीत, उलट शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज जे कृषी विधेयक आले आहे त्याचा मसुदा हा शरद पवार हे कृषिमंत्री असतानाच तयार झाला होता. ’दिल्लीत ज्या आंदोलनाची सुरुवात झाली, ती केवळ किमान हमी भावाचा कायदा करा, या एकाच गोष्टीसाठी झाली होती,’ असे सांगत पटेल म्हणाले, की किमान हमी भावाचा कायदा करा या मागणीसाठी पंजाब, हरियाणा शेतकर्यांनी दिल्लीकडे कूच केली होती. तोपर्यंत या तीनही कृषी विधेयकाचे स्वागत जवळपास देशातील सर्व संघटनांनी केले आहे.