कराड प्रतिनिधी- सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी ( ता. 14) सायंकाळी संबंधित क...
कराड प्रतिनिधी- सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी ( ता. 14) सायंकाळी संबंधित कुटुंबियांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तीन मुलींसह आईला उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सोळा तारखेच्या पहाटे यातील दोन मुलींचा तर उपचार घेत असताना आज तिसर्या मुलीचाही मृत्यू झाला. मृत्यूचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. सासवे कुटुंबातील तीन्ही
मुलींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आस्था शिवानंद सासवे (वय 9), आयुशी शिवानंद सासवे (वय 3), आरुषी शिवानंद सासवे (वय 8 वर्षे, रा. मिल्ट्री हॉस्टेल शेजारी, सैदापूर, ता- कराड) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी : कराड शहरालगतच्या सैदापूर येथील मिलिटरी होस्टेल शेजारी सासवे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सोमवारी (ता. 14) सायंकाळी सहा वाजता सासवे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जेवण केले. जेवणामध्ये त्यांनी चकुली, वांग्याची भाजी, वांग्याची आमटी आणि भात खाल्ला. त्यानंतर रात्री ते झोपी गेले. मात्र मध्यरात्री एकच्या सुमारास शिवानंद यांची पत्नी आणि आरुषी, आस्था व आयुषी या तिन मुलींना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शिवानंद यांनी सैदापूर येथील डॉ. पाटील यांच्याकडे रात्री त्यांना उपचारासाठी नेले. डॉक्टरांकडून औषधे घेऊन ते घरी परतले. मात्र 16 तारखेला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आस्था, आरुषी व आयुशी यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिघींनाही उपचारासाठी कराड येथे कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर आस्था आणि कु. आयुषी यांचा मृत्यू झाला. आरुषीला कृष्णा रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. तिची प्रकृती सुधारत असतानाच आज सकाळी तिचाही मृत्यू झाला. मृत्यूचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी
कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे तपास करत आहेत. मृत्यू झालेल्या तिन्ही मुलींचा व्हीसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे. उद्या व्हीसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वरुटे यांनी दिली. तिने मुलींच्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगता येणार नसून व्हीसेराचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.