मुंबई: भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांसारख्या...
मुंबई: भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांसारख्या नेत्यांनी केलाय. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठीच ते अशाप्रकारचे दावे करत सुटल्याची टीका पडळकर यांनी केली आहे.
“अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहे,” असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.
भाजपला सत्ता ही लोककलण्यासाटी हवी असते. तर महाविकास आघाडीतील नेत्यांना सत्ता ही स्वत:च्या कल्याणासाठी हवी असते, अशी टीकाही त्यांनी केलीय. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा पडळकर यांनी केलाय. त्याचबरोबर तुरुंगातील सतरंजीवर झोपण्यापेक्षा तुम्हाला विश्वासघातानं राजगादी मिळाली आहे. ती गादी सांभाळा आणि लोककल्याणासाठी सत्तेचा वापर करा, असा सल्लाही पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय.
गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही पडळकरांनी चांगलाच समाचार घेतला. पडळकर यांनी एक पत्रच संजय राऊतांना पाठवलं आहे. “खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”, अशा शब्दात पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले.
संजय राऊत हे ‘मातोश्री’चं खातात आणि ‘गोविंदबागे’चं गातात अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर निशाणा साधलाय. शरद पवार यांच्याविषयी आपण काही विधानं केली. त्यावेळी राऊतांचा चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपली निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहे, असा घणाघाती टीका पडळकरांनी केलीय.
-------------------------