मायणी / प्रतिनिधी : येथील चांदणी चौकात झालेल्या बलात्कार प्रकरणातील संशयितास पोलिसांनी 12 तासांत अटक केली. प्रभाकर यल्लप्पा पगडम (वय 42, ...
मायणी / प्रतिनिधी : येथील चांदणी चौकात झालेल्या बलात्कार प्रकरणातील संशयितास पोलिसांनी 12 तासांत अटक केली. प्रभाकर यल्लप्पा पगडम (वय 42, मूळ रा. पगडीयाला, ता. नंदीकोट, जि. कर्नुल आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्यास पाच दिवस दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील चांदणी चौकात दहिवडी रस्त्याच्या बाजूला घड्याळाच्या दुकानासमोर 60 ते 65 वर्षे वयाच्या वेडसर महिलेवर (मूळ रा. मुद्देबिहळ, ता. भोगवाडी, जि. विजापूर) 35 ते 40 वर्षे वयाच्या पुरुषाने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यामध्ये संबंधित बलात्कार करणारा संशयित दृष्टीस आला. पोलिस कर्मचार्यांनी फुटेजमधील संशयिताची छबी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित केली. त्याचा चांगला उपयोग झाला. विटा, ता. खानापूर, जि. सांगली येथील काही तरुणांनी संबंधित वर्णनाची व्यक्ती तेथे आढळून आल्याचे पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीवरून, वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस दूरक्षेत्रातील सहायक फौजदार गुलाबराव दोलताडे, पोलिस नाईक बापूराव खांडेकर, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे आदींच्या पथकाने काल (शुक्रवार) पाच वाजता संशयितास ताब्यात घेतले. त्यास वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर करत आहेत.