राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आज जाईल, उद्या जाईल असं भाजपचे नेते सांगतात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान परिषदेच्या निवडणुक...
राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आज जाईल, उद्या जाईल असं भाजपचे नेते सांगतात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील भाजपची सत्ता येईल, असा दावा केला होता. प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाला तीन जागांवर पाणी सोडावं लागलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एका-एका जागेचा फायदा झाला. शिवसेनेच्या हाती काही लागलं नाही. विधान परिषदेचा निकाल पाहिला, तर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आणखी भक्कम झालं असं म्हणता येईल.
अति घाई संकटात नेई, असं म्हटलं जातं. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ते खरं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याची घाई केली आणि तोंडघशी पडले. धुळे-नंदुरबार मतदारसंघातील अमरिश पटेल यांच्या विजयानंतर राज्यातील महविकास आघाडीची सत्ता आता संपेल असं सांगणार्या भाजपच्या नेत्यांची बोलतीच नंतरच्या निकालांनी बंद केली. अमरिश पटेल काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या मतदारसंघातील विजय हा भाजपचा नसून व्यक्तिगत पटेल यांचा आहे, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात धनशक्तीचा विजय होतो, हे वारंवार स्पष्ट झालं आहे. एखाद्या पक्षाकडं कितीही मतं असली, तरी त्यांचा उमेदवार पैसा खर्च करणारा नसेल, तर येथील मतदार पैसे देणार्यांच्या मागं असतो, हे या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला चांगलंच कळलं असेल. नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा अनुभव आला होता. पटेल यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील विसंवाद पुढं आला असून त्यातून सरकार पडेल, अशी विधाने करणारे भाजपचे नेते नंतर मात्र पडलो, तरी नाक वरच अशा पद्धतीनं बोलायला लागले. भारतीय जनता पक्षाची गेली तीन दशकं सत्ता असणारी संस्थानं या निवडणुकीत खालसा झाली. नितीन गडकरी, जयसिंगराव गायकवाड, प्रकाश जावडेकर, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्यांनी ज्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले, ते मतदार संघ भारतीय जनता पक्षाला गमवावे लागले. मागच्या निवडणुकीत बंडखोरी झाल्यानं चंद्रकांतदादांचा विजय झाला होता, त्याचा वचपा आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत काढला. काँग्रेसचा धुळे-नंदुरबार मतदारसंघात पराभव झाला असला, तरी त्यानं नागपूर पदवीधर आणि पुण्यातील शिक्षक मतदारसंघाची जागा पदरात पाडून घेऊन हिशेब चुकता केला. चंद्रकांतदादा आणि जयंत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पुणे पदवीधर मतदारसंघात पणाला लागली होती. त्यात जयंत पाटील यांनी प्रतिष्ठा राखली. पदवीधर मतदारसंघ आता आतापर्यंत भाजपचे बालेकिल्ले होते. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सुरुंग लावले. नाशिक पदवीधर मतदारसंघ डॉ. सुधीर तांबे यांनी भाजपकडून हिसकावून घेतला, तर सतीश चव्हाण यांनी ही औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ भाजपकडून काढून घेतला. चव्हाण यांनी तिसर्यांदा विजय मिळवून हॅट्रीक केली. त्याअगोदर भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत हातात घड्याळ बांधलं.
भारतीय जनता पक्षानं एक जागा जिंकली, तरी तीन जागा गमावल्या. या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा मिळवता आली नाही. अर्थात शिवसेनेकडं यापैकी एकही मतदारसंघ नव्हता. त्यामुळं तिला गमावण्यासारखं काहीच नव्हतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा या निवडणुकीत फायदा झाला. दोन्ही पक्षांना एक-एक जागा अधिक मिळाली. धुळे आणि नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं विजय मिळवला आहे. याठिकाणी काँग्रेसला मोठा फटका बसला. जास्त मतदान असूनही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसची मतं फुटल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या पटेल यांना 332 मतं मिळाली. काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ 98 मतं मिळाली. पटेल यांनी विरोधकांची 115 मतं फोडण्यात यश मिळवलं. या निवडणुकीसाठी भाजपच्या 199 तर महाविकास आघाडीच्या 213 सदस्यांनी मतदान केलं होतं. त्यात महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या 50हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना केवळ 98 मतंच मिळाली. महाविकास आघाडीच्या अंदाजे 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. महाविकास आघाडीची 213 मतं असतानाही पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्रीक साधली. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत चव्हाण यांनी सलग तिसर्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे. चव्हाण यांना एक लाख 18 हजार 638 मतं मिळाली, तर बोराळकर यांना 58 हजार 743 मतं मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजपत बंडखोरी होऊनही राष्ट्रवादीच्या उमेदवारानं दुप्पट मतं मिळवित विजय मिळविला. 2014 च्या तुलनेत यंदा दुप्पट मतदान झाल्यानं औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भाजप व आघाडीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे होती; मात्र चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती टिकवून धरली. पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीनं झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत लाड यांना तब्बल एक लाख 22 हजार 145 मतं मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मतं मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षात इथं बंडखोरी नव्हती. मनसेचा उमेदवार रिंगणात होता; परंतु त्याचा कोणताही परिणाम लाड यांच्यावर झाला नाही. चंद्रकांतदादा यांच्यासाठी कोथरूडची जागा सोडणार्या मेधा कुलकर्णी यांना दिलेला शब्द न पाळल्यानं त्याची किंमत भाजपला मोजावी लागली. पुणे पदवीधरची निवडणूक अगदीच एकतर्फी झाली. भाजपला तिथं आव्हान उभं करता आलं नाही. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली या महापालिका, मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धनंजय माने वगळता सर्वंच खासदार भाजपचे असतानाही भाजपला पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीच्या पाटलांनी भाजपच्या पाटलांना पराभूत केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे.
नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय. या मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्त्व केलं. देवेंद्र फडणवीस हे ही नागपूरचेच. काँग्रेसनं वंचित आघाडीतून आलेल्या अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली. त्यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थेट प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. त्याच वंजारी यांना 55 हजार 947 मतं मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 41 हजार 540 मतांवर समाधान मानावं लागलं. वंजारी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मानला जात असताना, वंजारी यांचा विजय फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणार्या भाजपला यंदा महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळं धक्का बसला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्षानं आघाडी घेतली आहे. तिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिसर्या क्रमांकावर फेकला गेला.