शिक्षणवेध - प्रतिक हिंगडे आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून कसे रहाता येईल यासाठी प्रत्रेक जन प्रयत्न करताना दिसतो. खासगी क्षेत्राती...
शिक्षणवेध - प्रतिक हिंगडे
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून कसे रहाता येईल यासाठी प्रत्रेक जन प्रयत्न करताना दिसतो. खासगी क्षेत्रातील नोकरीची अनिश्चितता यामुळे बहुतांशी तरुण वर्ग हा स्पर्धा परीक्षांकडे वळालेला आपणास दिसतो. ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी पोलिस भरती, सरळसेवा भरती, एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करताना आपणास दिसतात. पण त्यांच्या वेदना कोणीच समजून घेत नाही. शासन व्यवस्था बदलत राहते पण या मुलांच्या प्रश्नांकडे सर्वांचेच दुर्लक्ष राहिले आहे. सन २०१६ पासून नोकरभरती पूर्णतः बंद आहे. शेवटी इलेक्शन तोंडावर आले आणि ७२००० मेगा भरतीच्या नावाखाली मुलांकडून वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरून घेतले पण ७२००० पदांची घोषणा केली प्रत्येक्षात तितक्या जागा खरंच सुटल्या का? बरं जेवढ्या जागा सोडण्यात आल्या त्याचे फॉर्म भरून घेऊन आज दोन वर्ष होत आली तरी त्यावर काहीच हालचाल दिसत नाही. मुळात मुलांची मागणी हीच आहे की परीक्षा ऑनलाईन नाही तर पूर्वीप्रमाणे जिल्हा निवड मंडळामार्फत ऑफलाईन घ्यावी. पण वेळकाढू पना करून शासनाला नेमक काय साध्य करायचं आहे याची कल्पना नाही. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासिकेत अभ्यास करतात. येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्याची तयारी ठेवतात. खूप प्रतिकूल परिस्थितीत मुले तयारी करत असतात याची जाणीव शासनाने ठेवणे गरजेचे आहे. काही मुले पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करतात. काही मुलांचे पालक पैसे पूरऊन हताश झाले. मुले रोज अभ्यास करतात पण परीक्षा कधी होईल कोणालाच माहित नाही फक्त कुठेतरी मनातील एक आशा जीवंत ठेऊन तो विद्यार्थी अभ्यास करत असतो. आज ना उद्या परीक्षा होईल आणि मला नोकरी लागेल अशी आशा ठेऊन तो अभ्यास करत असतो. बाहेर राहायचं म्हटल्यावर रूम भाडे आले, मेस, क्लास, अभ्यासिका हा सर्व खर्च करून मुले अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या फक्त एकच डोक्यात असते की आज नाहीतर उद्या आपल्याला यश मिळेलच. पण जर शासन भरती करणारच नसेल तर कोणत्या भरवश्यावर या मुलांनी अभ्यास करायचा हा प्रश्न या ठिकाणी पडतो. काल परवाच्या निवडणुकीत याच तरुण वर्गाला खोटी आश्वासने दिली गेली पण आजची परिस्थिती काय? आज तरुणांचे प्रश्न आहे तसेच आहेत. जर या राज्यात किंबहुना देशामध्ये तरुण सक्षम नसेल तर खरंच आपण आपला देश महासत्ता बनवू शकतो का? एमपीएससी च्या बाबतीतही असेच काहीतरी राज्यसेवा परीक्षेमध्ये डी वाय एस पी पदाच्या जागा एकही नाही उपिल्हाधिकारी, तहसीलदार ही पदेही जाहिरात मधून वगळण्यात आली. खरंच ही पदे रिक्त नाहीत का? तसे असेल तर खरंच ही गमतीची बाब म्हणावी लागेल. तसेच यापूर्वी सरळसेवा मार्फत एका जिल्हापरिषद मध्ये ग्रामसेवक भरती झाली त्याची वेटींग लिस्ट पात्र मुलांना घेण्याची सुबुद्धी जिल्हा परिषद प्रशासनाला सुचली नाही. बरं यांच्यावर देखरेख ठेवायला किंवा जिल्हा परिषद वर कारवाई करायची शासनाची हिम्मत झाली नाही. एकतर राज्यातील शासन व्यवस्था नोकरभरती करत नाही आणि जी जाहिरात सोडली आहे ती पूर्ण करत नाही हा असा सगळा सावळा गोंधळ अलीकडच्या काळामध्ये परीक्षार्थींना पाहायला मिळतो आहे. शासनाने मुलांची व्यथा समजून घ्यावी आणि नुसती समजून न घेता त्यांच्यावर अन्याय होणार नही याचीही दक्षता घ्यावी. आज महाराष्ट्रातील तरुणाच्या भावना जर शासन समजून घेणार नसेल तर ही मुले विश्वास कोणावर ठेवतील.? अगोदर परीक्षा ऑनलाईन घायची की ऑफलाईन या विषयावर भरती प्रक्रिया ठप्प राहिली. नंतर कोरोनाचे संकट यामध्ये आता वर्ष निघून गेल्यातच जमा झाले पण या मुलांचं काय? यांचे प्रश्न यांच्या अडचणी कोण सोडवणार. ही संकटे कमी नव्हती की काय दुसरीकडे खासगी क्लास वाल्यांनी भरमसाठ क्लासची फी वाढवली जे परीक्षांचा अभ्यास करत होते त्यांनीच स्वतःचे क्लास सुरू केले खरोखर सर्व क्लास दर्जेदार आहेत का आणि याचे उत्तर हो असेल तर यांची पात्रता कोणी तपासली? ग्रामीण भागातून आलेला नविन विद्यार्थी अनभिज्ञ असतो तो कोणावरही पटकन विश्वास ठेवतो वर्ष वर्ष क्लास करूनही त्याची काहीच प्रगती दिसत नाही मग अशा फसव्या क्लास वर अंकुश ठेवणार कोण? म्हणजे स्पर्धा परीक्षांचे बाजारीकरण सुरू झाले असे म्हटले तर नवल नसावे. आम्ही मुलांसाठी काम करतो मुलांना सवलत देतो हे फक्त भाषण करताना व्यासपीठ जिंकण्यासाठी केलेला प्रयत्न असावा कारण वास्तव परिस्थिती पाहता कोणी कोणाला फी सोडत नाही. सामान्य कुटुंबातील मुलाने शिक्षण घेतले हा त्याचा गुन्हा म्हणावा का? की मोठ्या पदांवर फक्त धनदांडग्यांनी बसावे का? आज राज्यातील तरुण वर्गाला शासनाकडे नोकर भरती करा अशी म्हणण्याची वेळ येत असेल तर या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट दुसरी ती काय असू शकते. आज प्रत्येक तरुण तरुणींच्या मनामध्ये काहीतरी चांगले करण्याची इच्छा आहे पण त्यासाठी संधी त्यांना उपलब्ध होत नाही याला जबाबदार कोण? आतातर पदवीधर मतदान झाले भविष्यातही त्या निवडणुका होतील तेव्हा पदवीधर मुलांचा मताचा टक्का कसा वाढेल यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो पण त्याच मुलांच्या समस्या त्यांच्या अडचणी कोणीच समजून घेत नाही. आज उच्चशिक्षित तरुण कोणत्याही पदासाठी अर्ज करतो कुठल्याही क्षेत्रांमध्ये कोणतीही नोकरी करण्याची तो तयारी दर्शवतो याला कारण हेच प्रचंड बेरोजगारी. आणि ही बेरोजगारी शासनाने काही गोष्टींची बारकाईने नोंद घेऊन योग्य असे निर्णय घ्यायला हवेत तसेच नोकर भरती लवकरात लवकर करून या तमाम तरुण वर्गाला दिलासा द्यावा हीच अपेक्षा आहे. तसेच पोलिसांवर प्रचंड कामाचा तान आहे त्याचे कारण म्हणजे अपुरे पोलिसबळ पोलिसांच्या जागा रिक्त असूनही तशा जागा सुटत नाहीत. बेरोजगारी कमी करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रित ठेवणे तसेच तांत्रिक शिक्षणावर भर देणे ही काळाची गरज ठरत आहे . साध्याची जागतिक परिस्थिती आणि आपली अभ्यास पद्धती याचा विचार होणे आवश्यक आहे. जगातील वाढती स्पर्धा, नव नवीन तंत्रज्ञानात होत असलेली प्रगती व आपली अभ्यास पद्धती याची योग्य सांगड घातली गेली पाहिजे. तसेच नवनवीन उद्योग कसे येतील व सुशिक्षित तरुणांना रोजगार कसा प्राप्त होईल यावर सरकार ने निःपक्षपाती पने विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक भरती प्रक्रिया ठराविक वेळेतच आणि पारदर्शक कशी होईल याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.