विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर कारवाई संगमनेर/प्रतिनिधी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारीच्या लाचखोरीचे प्रकरण पोलीस ठाण्यात...
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर कारवाई
संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारीच्या लाचखोरीचे प्रकरण पोलीस ठाण्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांना भोवली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर आज मंगळवारी दि.१५ रोजी संगमनेरात आले असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर शहरचे निरीक्षक मुकूंद देशमुख यांची नियंत्रण कक्षात हकालपट्टी करण्यात आली आहे. आपल्या कडक शिस्तीच्या कामकाजासाठी काही दिवसांतच शहरातील नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरलेले पो.नि.देशमुख यांना आपल्या पोलिस ठाण्यातीलच एका पोलिस कर्मचार्यानेच लाच घेत त्यांच्या कार्यकाळाला बट्टा लावल्याचे काम केले. परिणामी आज विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी केलेल्या कारवाईस त्यांना सामोरे जाण्याची वेळ आली.
महिनाभराच्या कालावधीत संगमनेर आणि अकोले पोलीस ठाण्यात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग तीन छापे टाकत एका उपनिरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. यातील दोन छापे तत्कालिन पोलीस निरीक्षकांच्या काळात संगमनेर, अकोलेत झाल्याने त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक परमार यांचा संगमनेरातील कार्यकाळ संपल्याने ते नगरच्या गुन्हे शाखेसाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या शेवटच्या काही दिवसांतच शहर पोलीस ठाण्यात नाशिकच्या सराफाकडून तब्बल १ लाख रुपयांची लाच स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी पकडला गेला आणि शहर पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या रडारवर आले. पाटील यांनी निरीक्षक परमार यांना नियंत्रण कक्षात बोलावल्याने त्यांच्या गुन्हे शाखेच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले.